बेदम मारहाणीत लष्करातील जवानाचा मृत्यू, नगरसेवकासह 9 जणांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामिळनाडूतील कृष्णगिरीमध्ये पाण्याच्या टाकीजवळ कपडे धुण्यावरून वाद झाला. त्यानंतर द्रमुकचे नगरसेवक चिन्नागिरी आणि इतर लोकांनी लष्करातील जवान प्रभाकरन यांना बेदम मारहाण करून हत्या केली.

8 फेब्रुवारीला जवान प्रभाकरन (वय – 33) आणि द्रमुकचे नगरसेवक चिन्नास्वामी यांच्यात पोचमपल्ली येथील टाकीजवळ कपडे धुण्यावरून वाद झाला. दोघांमध्ये जोरदार वादविवाद आणि भांडण झाले. त्याच रात्री चिन्नासामी आणि इतर नऊ जणांनी प्रभाकरन आणि त्याचा भाऊ प्रभू यांच्यावर हल्ला करून त्यांना बेदम मारझोड केली.

प्रभाकरनला केलेल्या मारहाणीमुळे तो गंभीररीत्या जखमी झाल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले, मात्र तेथेच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची तक्रार त्यांचा भाऊ प्रभू यांनी पोलिसांत दाखल केली. तेव्हा तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी सहा जणांना अटक केली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये चिन्नास्वामी यांचा मुलगा राजापांडी याचाही समावेश आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून चिन्नास्वामीचा शोध सुरू आहे. हल्ल्यानंतर ते फरार आहेत.