तोडगा निघाला नाही तर आंदोलन करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। सिंधुदुर्गनगरी

रस्त्याच्या मागणीसाठी काळसे धनगरवाडीतील ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण आज चौथ्या दिवशीही सुरूच आहे. तसेच दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. दरम्यान या उपोषणकर्त्यांची जिप पदाधिकाऱ्यांनी भेट घेत आपल्याला रस्ता मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो अशी ग्वाही दिली. मात्र त्यावर समाधान न झाल्याने या ग्रामस्थांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. तसेच प्रशासनाने या आंदोलनाची ३१ जानेवारी पर्यंत दखल न घेतल्यास केव्हाही काळसे धनगरवाडी येथे कडेलोट आंदोलन करणार असल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.

मालवण तालुक्यातील डोंगराळ भागातील काळसे धनगरवाडी येथे जाण्यासाठी रस्ता नाही. ग्राप 23 नंबरला नोंद असतानाही रस्ता पूर्ण केला जात नाही त्यामुळे धनगरवाडी पर्यंत जाणारा रस्ता तयार करण्यात यावा या मागणीसाठी काळसे धनगरवाडी येथील ग्रामस्थांनी 26 जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले असून ते आज चौथ्या दिवशीही सुरु आहे. दरम्यान या उपोषणकर्त्यांची जिप उपाध्यक्ष रणजीत देसाई, वित्त व बांधकाम समिती सभापती जेरॉन फर्नांडिस, समाज कल्याण समिती सभापती अंकुश जाधव यांनी भेट घेतली आणि मंजूर रस्त्यावर असलेले अतिक्रमण तात्काळ पोलीस बंदोबस्तात हटविण्याचा ठराव स्थायी समिती सभेत घेवून रस्त्याच्या कामाला सुरुवात करू आणि राष्ट्रीय पेय जल अंतर्गत पाण्याची सुविधा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही रणजीत देसाई व जेरॉन फर्नांडिस यांनी दिली.

तसेच समाज कल्याण मार्फत रस्त्यासाठी 3 लाखाचा निधी देऊ अशी ग्वाही अंकुश जाधव यांनी देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र आपल्याला दरवेळी आश्वासने दिली जातात त्यांची पूर्तता होत नाही. त्यामुळे आपली मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार काळसे धनगरवाडी येथील ग्रामस्थांनी केला आहे. तसेच आपल्या मागणीबाबत 31 जानेवारी पर्यंत तोडगा न निघाल्यास केव्हाही काळसे धनगरवाडी येथे डोंगराच्या कड्यावरून उडी घेत कडेलोट आंदोलन करू असा इशाराही या उपोषणकर्त्यांनी दिला आहे.

दोघांची प्रकृती खालावली

गेले चार दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या काळसे धनगरवाडी ग्रामस्थांपैकी शामू वरक आणि देवु वरक या उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावली आहे. जिल्हा रुग्णालयातून आलेल्या डॉ. अशोक गवळी यांनी सम्बंधितांची तपासणी करत जिल्हा रुग्णालयात दाखल होण्याची विनंती केली. मात्र आपली मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण स्थळ सोडणार नाही असा निर्धार त्यांनी केला आहे.