
सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी
राज्याच्या अर्थसंकल्पात एक हजार नवीन एस.टी. बस खरेदीसाठी निधी मंजूर आहे. यापैकी शंभर नवीन एस.टी. बस लवकरच सिंधुदुर्गात दाखल होतील. एस.टी. सर्वसामान्यांसाठी जीवनवाहीनी म्हणून कार्यरत असते. सिंधुदुर्गनगरी मधील बऱ्याच वर्षाची प्रलंबित असलेली नवीन बस स्थानकाची मागणी पूर्ण होत आहे. याचा मला विशेष आनंद होत आहे. सिंधुदुर्गनगरी पर्यटनदृष्ट्या तसेच जिल्ह्याचे मुखालय म्हणून सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी 25 कोटी रुपयांचा विशेष निधीही लवकरच विविध विकास कामांवर खर्च केला जाणार आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले.
सिंधुदुर्गनगरी येथील नवीन बसस्थानाकाचे उदघाटन आज वित्त व नियोजन व गृह राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, संजय पडते, पंचायत समिती सदस्य जयभारत पालव, ओरोस, आणाव व रानबांबुळीचे सरपंच उपस्थित होते.
यावेळी केसरकर म्हणाले की, राज्यासाठी एकूण एक हजार बसेस साठी निधीची मागणी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली होती. त्यापैकी शंभर बसेस सिंधुदुर्गाला देण्याच्या अटीवर त्यांना राज्याच्या अर्थसंकल्पात निधी मंजूर करण्यात आला आहे. त्या नवीन शंभर एस.टी. बसेस लवकरच जिल्ह्यात दाखल होतील. सिंधुदुर्गनगरी या जिल्ह्याच्या मुख्यालयाला गेल्या 25 वर्षात एस. टी स्थानकाची प्रतीक्षा होती. या वर्षी जिल्ह्यात तीन नवीन डेपोसाठी काम सुरू झाले आहे. त्यापैकी सिंधुदुर्गनगरी हे एक आहे. सर्वसामान्य जनतेची नाळ एस.टी. शी जोडलेली असते. या बस स्थानकामुळे येथे येणाऱ्या जनतेची तसेच येथील नागरिकांची मोठी सोय होणार आहे. सिंधुदुर्गनगरीला एक वेगळे स्वरूप यावे म्हणून 25 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यात येथील सुशोभीकरण तसेच इमारतींची डागडुजी अशी महत्वाची कामे केली जाणार आहेत. याच बरोबरच सिंधुदुर्गनगरीच्या प्रवेशव्दारावर सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे.

खासदार विनायक राऊत म्हणाले की गेली 25 वर्षे उपेक्षित असलेल्या सिंधुदुर्गनगरीला आता एक स्वरूप येऊ लागले आहे. गेल्या चार वर्षांत जेव्हा जेव्हा येथे आमच्या सभा झाल्या तेव्हा तेव्हा येथील नागरिकांची एस. टी. स्थानकाची एक प्रमुख मागणी होती. आज ती पूर्ण झाली आहे. लवकरच महामार्ग चौपदारीकरणाचे काम पूर्ण होईल. त्यामुळे येथील एस. टी. स्थानकाला एक वेगळे महत्व प्राप्त होणार आहे. या परिसरात जागा उपलब्ध करून दिल्यास एक वर्षभरात येथे सुलभ शौचालय सुद्धा उपलब्ध करून दिले जाईल असेही ते म्हणाले.
आमदार वैभव नाईक म्हणाले की जेव्हा येथील कार्यकर्ते बस स्थानकाची मागणी करत होते तेव्हा त्यांच्या मागणीचा पाठपुरावा करताना जागेपासून सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार येथील या नूतन बस स्थानकाचे आज उदघाटन झाले आहे. त्यामुळे येथील सर्वसामान्य जनतेला त्याचा फार मोठा फायदा होणार आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून येथे पेट्रोल पंप सुरू झाला तसेच एक मार्केटही व्हावे अशी मागणी जनतेतून आहे याचाही त्यांनी उल्लेख केला.
तसेच जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यावेळी म्हणाले की प्रत्येक एस. टी. स्थानकाला ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व असते. आणि ती त्या गावाची ओळख असते. एस. टी तुन प्रवास हा जसा आनंददायी असतो तसेच त्यामुळे सर्वसामान्य माणसांशी संवाद साधण्याचे मोठे व्यासपीठ उपलब्ध होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. टी. चे विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी केले. यावेळी त्यांनी या स्थानकाची सर्व तांत्रिक माहिती सांगितली. तर सूत्र संचालन अभय खडपकर यांनी केले. यावेळी सिंधुदुर्गनगरी कणकवली या बसचा शुभारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या बस मधून पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्यासह पत्रकार यांनी गाडीतून प्रवासाचा आनंद घेतला. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































































