कुपवाड एमआयडीसीतील कारखान्यात चोरी करणारी सातजणांची टोळी गजाआड, साडेनऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

एमआयडीसीतील बंद असलेल्या एक्सलंट इंजिनीअर कारखान्याच्या शटरची कुलपे तोडून आतील मशिनरींची चोरी करणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात कुपवाड पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी सातजणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून साडेनऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

महेश विजय माळी (वय 33, रा. स्वामी मळा, कुपवाड, मूळ रा. पेठभाग, ता. वाळवा), सतीश विष्णू माळी (वय 27, रा. स्वामी मळा, कुपवाड, मूळ रा. दत्त मळा, कावलापूर), धनंजय आनंदराव पाटील (वय 31), राहुल रमेश पवार (वय 21), शुभम संजय शितोळे (वय 23, तिघे रा. कापसे प्लॉट, कुपवाड), पंकज हणमंत मुरगे (वय 21, रा. ज्ञानेश्वरनगर, बुधगाव), शाहरूख फारूक मकानदार (वय 26, रा. जुना बुधगाव रोड, कुपवाड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रोहिणी किशोर पटवर्धन यांनी फिर्याद दिली होती.

कुपवाड एमआयडीसीतील प्लॉट नं. डब्ल्यू. 76 मध्ये एक्सलंट इंजिनीअरिंग कारखाना आहे. हा कारखाना 16 मे 2022 ते 10 नोव्हेंबर 2022 या कालावधीत बंद होता. हीच संधी हेरून चोरटय़ांनी कारखाना बंद असताना हायड्रॉलिक व न्यूमॅटिक सिलिंडर, कार ड्रिलिंग टूल्स, फ्लॅट क्रीन मॉनिटर, प्रिंटर, मेटल स्ट्रिप्स, स्टीलचे बेअरिंग, टूल्सना धार लावण्याच्या मशिन्स, टॉगल क्लॅम्स बॉक्स, ड्रिलिंग टूल, अटॅचमेंट कॉल ऍडॉप्टर, लोखंडी नट-बोल्ट, हार्डनेस टेस्टिंग मशिनवरची लोखंडी ऍटॅचमेंट स्टिल प्लेट असा एकूण 9 लाख 11 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी तक्रार दाखल होताच कुपवाडचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत सात संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांच्याकडून चोरीचे दोन गुन्हे उघडकीला आले. दोन्ही घटनांमधील नऊ लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.