
लोकमान्य टिळक टर्मिनसजवळील रेल ह्यू इमारतीच्या बाराव्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत 33 रहिवाशांची अग्निशमन दलाने थरारकरीत्या सुटका केली. त्यामुळे सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नाही.
रेल ह्यू इमारतीला दुपारी 2.45 वाजताच्या सुमारास आगीचा भडका उडाला. या ठिकाणी असणारी वायरिंग, अडगळ, घराचे लाकडी दरवाजे आणि घरातील कपडे-सामानाने पेट घेतल्याने आगीचा प्रचंड धूर निर्माण झाला. हा धूर अकराव्या मजल्यावरही पसरल्याने घबराट निर्माण झाली. यामुळे अनेकांनी इमारतीच्या खाली धाव घेतली, तर काही जणांनी आग आणि धुरापासून बचाव करण्यासाठी खिडकी-सज्जाचा आधार घेतला. शिवाय काही जण वरच्या मजल्यावर अडकून पडले होते. आग वाढत गेल्याने अग्निशमन दलाने ‘लेव्हल-2’ची आग जाहीर केली. यावेळी अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. यामध्ये अग्निशमन दलाने शिडी आणि दोरीच्या सहाय्याने 33 जणांची सुटका केल्याने मोठी दुर्घटना टळली.
सवादोन तासांनी आग आटोक्यात
घटनास्थळी अग्निशमन दलाचे आठ फायर इंजिन, पाच जम्बो वॉटर टँकर आग विझवण्यासाठी वापरण्यात आले. सुमारे सवादोन तासांच्या अथक प्रयत्नाने आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती अग्निशमन दलप्रमुख हेमंत परब यांनी दिली. दरम्यान, माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
धुराचा त्रास झाल्याने सहा जण रुग्णालयात
रेल ह्यू इमारतीला लागलेल्या आगीच्या घटनेत 33 रहिवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र आगीमुळे सहा रहिवाशांना धुराचा त्रास झाला असून त्यांना जवळील एसआरव्ही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सगळय़ांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाचे डॉ. सेन यांनी सांगितले. रुग्णालयात दाखल असणाऱयांमध्ये अर्चना मालवणकर (34), अंजली आंद्रे (26), नीना आंद्रे (50), ऋतुजा पोहक (17), कैलास आंद्रे (54), सचिन आंद्रे ( 50) यांचा समावेश आहे.

































































