
दिल्ली येथील संसदेत गोंधळ घालणारा अमोल शिंदे याच्या घरी लातूर जिल्हा पोलीस दाखल झाले. त्याच्या कुटुंबियांची चौकशी करत पोलिसांनी घराची झाडाझडती घेतली.
दिल्ली येथील संसदेत गोंधळ घालणारा अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील मौजे झरी बु. येथील मूळ रहिवासी आहे. त्याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर तो लातूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे जाहीर झाले. तातडीने लातूर जिल्ह्यातील पोलीस पथक चाकूर तालुक्यातील झरी बु. येथे त्याच्या घरी पोहंचले. अमोल शिंदे याच्या आई – वडिलांची पोलीस चौकशी केली. त्यांना पोलिसांनी अनेक प्रश्न विचारले आहेत.
दरम्यान अमोल शिंदे हा पोलीस भरतीचा सराव करीत होता. तो सैन्य दलात नोकरीसाठी पण प्रयत्न करत होता परंतु, आता भरतीचे वय निघून गेले या नैराश्यातून तो दिल्ली येथे गेला होता. दिनांक 9 तारखेला तो पोलीस भरतीसाठी म्हणून घरातून गेला होता. जाताना त्याने घरी आता माझा मोबाईल लागणार नाही, असे सांगितले होते. मागील दोन – तीन दिवसात त्याच्याशी घरच्यांचा कोणाचा संपर्क झाला नाही.
अमोलचे आई – वडील मोलमजुरी करतात. महाविद्यालयात शिकत असल्यापासून तो घरी कमीच राहत होता, तो धावपटू होता त्यामुळे विविध स्पर्धांमधून तो सहभाग नोंदवत होता. त्यानेही मागील काळात मजुरी काम केले आहे. आपणास सैन्य दलात नोकरीची संधी नाही. पोलीस दलात भरती होत नाही या नैराश्यातून त्याने हा प्रकार केला असावा,असे सांगितले जात आहे.





























































