लातूर : वैद्यकिय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयातील सर्जिकल आयसीयू कागदावरच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात सर्जिकल आयसीयूचा स्वतंत्र विभाग करण्यात आला. प्रत्यक्षात केवळ विभागच स्वतंत्र कागदावर आणि तपासणीसाठी आलेल्या पथकास दाखवण्यापुरताच झाला. मागील दोन वर्षांपासून हा विभाग बंद असल्याचे सांगितले जात आहे.

लातूर जिल्ह्यात झालेल्या कोणत्याही अपघाताचे रुग्ण हे सर्वप्रथम शासकीय वैद्यकीय महावि़द्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयातच येत असतात. सर्जिकल आयसीयूची गरज आणि आवश्यकता असल्याकारणाने हा विभाग स्वतंत्र करण्यात आला. या विभागाचे एक प्रमुख प्रोफेसरही आहेत. परंतू ते कायम नांदेडला असतात असेच सांगीतले जाते. शासकीय वैद्यकीय महावि़द्यालयाच्या डीनचे ते नातेवाईक असल्याने त्यांच्या कामाकडे डोळेझाक केली जाते असे म्हटले जात आहे.

या सर्जिकल आयसीयुमध्ये केवळ एकच व्हेंटिलेटर आहे. फिलीप्स कंपनीचा हा व्हेंटीलेटर मागील दोन महिन्यांपासून बंद आहे. पूर्वी सर्जिकलचे रुग्ण अन्य आयसीयूमध्ये घेण्यात येत होते. परंतू हा स्वतंत्र विभाग झाल्यामुळे इतर आयसूयुमध्ये सर्जिकलचे रुग्ण घेतले जात नाहीत. मात्र सर्जिकल आयसीयूमध्ये कसलीच सुविधा रुग्णांना मिळत नाही. केवळ मोठ मोठ्या इमारती बांधून ठेवल्याने रुग्णांना त्याचा काहीच फायदा होत नाही. प्रत्यक्षात रुग्णांना सेवा सुविधा मिळतात का याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.