दुचाकी चोरणाऱ्या 5 जणांना अटक, पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुचाकी चोरणाऱ्या व चोरलेल्या मोटारसायकलचे पार्ट वेगवेगळे करून विकणाऱ्या 5 जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडील 1 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

काही दिवसापूर्वी पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथील हद्दीत दुचाकी चोरी झाली होती. त्या दुचाकीचे पार्ट वेगवेगळे करून विकण्याचे काम देवणी तालुक्यातील वलांडी येथील काही मेकॅनिक करीत आहेत, अशी माहिती मिळाल्याने सदर पथक त्या ठिकाणी पोहोचले. पथकाने मेकॅनिक शिराज चांद पाशा बावडीवाले (वय – 25 रा. वलांडी, संगमेश्वर) तुकाराम पुंडे (वय – 25, रा. माणकेश्वर ता. भालकी), कृष्णा कुंडलिक कांबळे (वय- 24 रा. बोंबळी बुद्रुक ता. देवणी), नानासाहेब विश्वनाथ गायकवाड (वय – 27 रा. चवण हिप्परगा ता. देवणी) या चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान सदर आरोपींनी मौजे हेळंब येथे राहणारा दशरथ यादव सूर्यवंशी हा चोरीच्या दुचाकी घेऊन येतो आणि चोरलेल्या दुचाकीचे पार्ट वेगळे करुन विक्री करतो, असे सांगितले. त्यावरून नमूद पथकाने दशरथ यादवराव सूर्यवंशी यास ताब्यात घेतले. दुचाकीचे पार्ट वेगळे केल्यानंतर त्याचे चेसिस विहिरीत फेकतो असे आरोपीने पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी विहिरीतील चेसिस ताब्यात घेतले असून पाचही आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.