कोण होते डॉ. शिवकुमार स्वामी? मोदी व राहुल गांधीही घ्यायचे आशीर्वाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लिंगायत समाजाचे गुरू महंत डॉ. शिवकुमार स्वामी यांचे सोमवारी वयाच्या 111 व्या वर्षी निधन झाले. ते बऱ्याच काळापासून आजारी होते. स्वामी यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी 3 दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला तसेच राज्यात उद्या सरकारी कार्यालयं बंद असणार आहे. स्वामी यांच्या जाण्याने देशाने एक अनमोल रत्न गमावल्याची प्रतिक्रिया कुमारस्वामी यांनी दिली आहे.

स्वामी हे वयाच्या 90 व्या वर्षापर्यंत काम करत होते. तसेच राजकीय दरबारातही त्यांना मानाचे स्थान होते. राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अनेक दिग्गज नेते स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी कर्नाटकातील तुमकुरू येथील सिद्धगंगा मठात येत होते. लिंगायत समाजात स्वामी यांचे स्थान मोठे होते. कर्नाटकात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात असल्याने स्वामी यांची भेट घेण्यासाठी राजकीय नेत्यांची रीघ लागत असे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री सिद्धारमय्या व काँग्रेस नेत्यांसह स्वामी यांची मठात भेट घेत आशीर्वाद घेतला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम व प्रणव मुखर्जी तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनीही स्वामींची भेट घेतली होती.

लिंगायत समाजाचे गुरू शिवकुमार स्वामी यांचे 111 व्या वर्षी निधन

‘कर्नाटक रत्न’ने सन्मान
1907 मध्ये शिवकुमार स्वामी यांचा जन्म झाला व 1930 मध्ये ते लिंगायत साधू बनले. यानंतर त्यांच्याकडे 600 वर्ष जुन्या मठाच्या प्रमुखपदाची जबाबदारी आली. सध्या मठात एकूण 8500 मुलं शिक्षण घेत आहेत. महंत शिवकुमार स्वामी हे राजकारणापासून दूर असले तरी लिंगायत समाजात त्यांना मानाचे स्थान होते. बी.एस.येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना त्यांनी एक आठवडाभर मठात डेरा टाकला होता. परंतु स्वामींना त्यांना पाठिंबा दिला नाही. तसेच ते भाजप समर्थक असल्याचेही मानले जात होते. कर्नाटक सरकारने स्वामी यांना ‘कर्नाटक रत्न’ या पुरस्काराने सन्मानीत केले होते. तसेच त्यांना भारतरत्न देण्याची शिफारसही सिद्धारमय्या सरकारने केलो होती.