अर्जेंटिना हरली दिनू निराश झाला, सुसाईट नोट लिहून घरातून गायब झाला

12


सामना ऑनलाईन । तिरुअनंतपूरम

सध्या सर्वत्र फिफा विश्वचषकाचा ज्वर जगभरातील अनेक शहरांवर पसरला आहे. लाखों फुटबॉलप्रेमी असे आहेत जे जगप्रसिद्ध फुटबॉलपटूंना देवाप्रमाणे मानतात आणि त्यांचा खेळ डोळ्याची पापणीही न हलवता बघत असतात. फुटबॉलपटूंवरील अतिप्रेमामुळे हे चाहते अनेकदा टोकाचं पाऊलही उचलताना दिसतात. असाच काहीसा प्रकार केरळामधील एका तरूणाबाबत घडला आहे. अर्जेंटिना आणि क्रोएशियाने यांच्यात झालेल्या डी ग्रुपमधील महत्त्वाच्या लढतीमध्ये क्रोएशियाने अर्जेंटिनाचा ३-०ने पराभव केला. अर्जेंटिनासारख्या बलाढ्य संघाचा असा दारूण झालेला पराभव अनेक चाहत्यांना निराश करणारा होता. परंतु केरळमध्ये राहणारा एका तरूणाच्या हा पराभव इतका जिव्हारी लागला असून तो चक्क घर सोडून गेला आहे.

केरळमध्ये राहणारा दिनू अलेक्स हा ३० वर्षीय तरूण अर्जेंटीनाचा स्टार खेळाडू मेस्सीचा खूप मोठा चाहता होता. घरातून निघून जाण्याआधी दिनू अर्जेंटीना विरूद्ध क्रोएशिया सामना पाहत होता आणि सामना संपल्यानंतरच तो बेपत्ता झाला आहे. त्याच्या घरातल्या मंडळींनी पोलीस चौकशीदरम्यान ही बाब सांगितली आहे. पोलिसांना त्याच्या घरातून एक सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये लिहिले आहे की, “माझ्या आयुष्यात आता काहीच शिल्लक नाही, त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे. माझ्या आत्महत्येसाठी कोणालाच जबाबदार धरू नये.”

पोलिसांशी बोलताना त्याच्या घरातल्यांनी सांगितले की, ‘तो स्वतः फुटबॉलपटू असून अर्जेंटीनाचा तो प्रचंड मोठा चाहता होता आणि लियोनेल मेस्सी हा त्याचा आवडता खेळाडू होता. सामन्याच्या दिवशी त्याने मेस्सीसारखे टी-शर्ट विकत आणले होते, ते घालूनच तो सामना पाहत होता. परंतु सकाळी ४ वाजता त्याची आई जेव्हा त्याला काहीतरी खाण्यासाठी देण्यास त्याच्या खोलीत गेली तेव्हा तो तिथे नव्हता. सगळीकडे शोधूनही तो न सापडल्याने त्याच्या आईने पोलिसांत धाव घेतली आणि तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.

आपली प्रतिक्रिया द्या