मुस्लिमांची ‘मन की बात’ही ऐका! जामा मशिदीच्या शाही इमामांचा मोदी-शहांना सल्ला

दिल्लीतील जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी नूह हिंसाचाराचा उल्लेख करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ मुस्लिमांचीही ‘मन की बात’ ऐकावी असे म्हटले आहे. केंद्र सरकारने मुस्लिम विचारवंतांशी चर्चा करावी, असा प्रस्तावही त्यांनी ठेवला आहे.

जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी नूह हिंसाचारावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की देशात ‘ द्वेषाचे वादळ ‘ निर्माण होत आहे. नूह हिंसाचार आणि चालत्या ट्रेनमध्ये रेल्वे पोलिस कॉन्स्टेबलने केलेली चार लोकांची हत्या यासारख्या अलिकडील घटनांचा उल्लेख करत बुखारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुस्लिमांची ‘ मन की बात ‘ ऐकण्याची गरज आहे आणि मोदी आणि शहा यांनी मुस्लिम समाजातील विचारवंतांशी चर्चा करावी असा सल्ला दिला आहे.

मला बोलावं लागतंय!

जामा मशिदीमध्ये शुक्रवारीत बुखारी यांनी मनातल्या गोष्टी बोलून दाखवल्या. ते म्हणाले की, ” देशातील सध्याच्या परिस्थितीमुळे मला बोलणे भाग पडते आहे. देशातील परिस्थिती चिंताजनक असून द्वेषाचे वादळ देशातील शांततेला गंभीर धोका निर्माण करत आहे. पंतप्रधान मोदींच्या मन की बातचा उल्लेख करताना बुखारी म्हणाले की तुम्ही तुमची ‘ मन की बात’ सांगता पण तुम्हाला मुस्लिमांची ‘ मन की बात ‘ देखील ऐकण्याची गरज आहे . मुस्लिम सध्याच्या परिस्थितीमुळे त्रस्त आहेत आणि त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता आहे.” द्वेष आणि जातीय हिंसाचार हाताळण्यात कायदा सुव्यवस्था ही असफल ठरत असल्याचेही बुखारी यांनी म्हटले आहे.