Aaditya Thackeray – आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांचं सकाळी 11 वाजेच्या सुमारास लखनऊ विमानतळावर आगमन झालं. त्यानंतर त्यांनी इस्कॉन मंदिरात पूजा आणि दर्शन घेतलं. त्यानंतर आता ते पत्रकार परिषदेला संबोधित करत आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे:

मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. मी सर्व भाषांमध्ये बोलणार आहे. गेल्या तीन चार वर्षांच्या काळात आपण म्हणजे शिवसेना परिवार चौथ्यांदा इथे येत आहे. राम मंदिराचं काम पूर्ण होत असल्याचा आनंद आहे. या मंदिर निर्माणासाठी अनेक शिवसैनिक महाराष्ट्र, यूपी आणि देशाच्या विविध राज्यांमधून येत आहेत. रामललाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. हा जल्लोष, इथलं वातावरण देशभरात पाहिलं गेलं पाहिजे असं आहे.

2018 मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत मी अयोध्येत आलो होतो. तेव्हा आम्ही घोषणा दिली होती की ‘पहले मंदिर फीर सरकार’. योगायोगाने नोव्हेंबरमध्ये मंदिरची घोषणा झाल्यानं एका वर्षात कोर्टाचा निकाल आला आणि आता मंदिर निर्माणाचं काम होत आहे. कोर्टाचे आम्ही आभार मानतो आहोत. पण त्याच बरोबर आम्ही इथे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. ही तीर्थयात्रा आहे, राजकीय यात्रा नाही. इथे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला सांगितलं की ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत बातचित करणार आहेत. तसेच इथे महाराष्ट्र सदन उभारण्यासंदर्भात बोलतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. साधारण 100 किंवा त्याहून अधिक खोल्याचं एक महाराष्ट्र सदन आम्हाला निर्माण करायचं आहे. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात इथे भाविक येत असतात त्यांच्यासाठी सदन उभारायचं आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

अयोध्या ही हिंदुस्थानच्या श्रद्धेशी जोडलेली एक भूमी आहे. मी इथं पहिलेही आलो असून तेव्हा आम्ही जी घोषणा केली होती त्यानुसारच चित्र पुढे दिसू लागलं. महाराष्ट्र आणि देशाची सेवा आमच्याकडून अधिकाधिक होत राहो असाच आशीर्वाद आम्ही मागत आहोत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत इस्कॉन मंदिर उभे करण्यासाठी मदत केली होती. तेव्हा पासूनचं आमचं नातं आहे. त्याला अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं त्यांनी इथं आम्हाला बोलावलं होतं. त्यामुळे तिथं पूजा केली, प्रसाद घेतलं. यानंतर रामललाचं दर्शन घेऊ, शरयू आरती करू.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)

हे राजकीय व्यासपीठ नाही. आमचं राजकारण साफ आहे. हिंदुत्त्व आम्ही कधीही सोडलेलं नाही. रघुकूलरित सदा चली आयी, प्राण जाए पर वचन न जाए… जे वचन आम्ही देतो ते आम्ही पूर्ण करतो. निवडणुका असो वा नसो, निवडणुका जिंको किंवा हरो, आम्ही वचन पूर्ण करतो असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

निवडणुका कोणत्याही असो. नशिब रोजच पाठीशी हवं असतं. चांगलं काम करण्यासाठी रामललांचे आशीर्वाद आवश्यक असतात. त्यासाठीच आम्ही इथं आलो आहोत.