नाशिकमध्ये महाविकास आघाडीची अतिविराट रॅली; राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे यांचे उमेदवारी अर्ज दाखल

महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे व राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे यांनी सोमवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अतिविराट रॅली काढण्यात आली. ठिकठिकाणी नाशिककरांनी रस्त्यावर उभे राहून, इमारतींवरून फुलांचा वर्षाव करीत त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. बुलंद घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. तेजाने तळपणारी शिवसेनेची मशाल देशात परिवर्तन घडवणार, हुकूमशाही नष्ट करणार, गद्दारांना गाडणारच, अशी ग्वाही देणाऱया या तुफानाने विरोधकांना चांगलीच धडकी भरली आहे.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून सोमवारी नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी विराट रॅलीला सुरुवात झाली. याप्रसंगी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. एका सजवलेल्या वाहनात उभे राहून ते जनतेला हात उंचावून अभिवादन करीत होते. रॅलीवर ठिकठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात फुलांचा वर्षाव करण्यात आला. मेनरोड येथे माजी महापौर विनायक पांडे यांनी भव्य पुष्पहार घालून उमेदवार वाजे यांचे स्वागत केले. भगवे झेंडे फडकावत, भगव्या टोप्या आणि उपरणे परिधान करून हजारो शिवसैनिक सहभागी झाल्याने भगवे तुफान उसळले होते.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून दिंडोरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या भव्य रॅलीला सुरुवात झाली. रॅलीत कांदा उत्पादकांना वाऱयावर सोडणाऱया पेंद्रातील भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी कांद्याच्या माळा घालून आलेले कार्यकर्ते लक्ष वेधून घेत होते.

यावेळी शिवसेना उपनेत्या निर्मला गावीत, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, आमदार नरेंद्र दराडे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, कुणाल दराडे, नितीन आहेर, गणेश धात्रक, राष्ट्रवादीचे श्रीराम शेटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल, आमदार हिरामण खोसकर, जीवन कामत, सुरेश राणे, वसंत गीते आदी उपस्थित होते.
विरोधकांना धडकी

‘राजाभाऊच खासदार’; ‘तुम्ही बदल घडवा, मी जिल्हा घडवतो’; ‘नाशिककरांशी जुळलेली नाळ, उज्ज्वल करतोय भविष्यकाळ’; ‘उच्चशिक्षित, नम्र, अभ्यासू, स्वच्छ चारित्र्य, सामान्यांची जाण आणि प्रामाणिक लोकप्रतिनिधी असा असावा’ या घोषवाक्यांसह राजाभाऊ वाजे यांची प्रतिमा असलेले फलक झळकावले जात होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है; शिवसेना झिंदाबाद; महाविकास आघाडीचा विजय असो; नाशिक का खासदार पैसा हो, राजाभाऊ वाजे जैसा हो या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. अब की बार भाजप तडीपार, 50 खोके एकदम ओकेचीही घोषणाबाजी सुरू होती. हे आघाडीचे शक्तीप्रदर्शन विरोधकांना धडकी भरवणारे होते.

इंडिया आघाडीचा पंतप्रधान होणार – बाळासाहेब थोरात

संपूर्ण देशात भाजपाविरोधी लाट असून, इंडिया आघाडीचाच पंतप्रधान होणार आहे, असा विश्वास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. देशात इंडिया आघाडीचा, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. त्यासाठीच सर्वांनी काम करा, चार जूनला विजयाची महारॅली काढा, असे आवाहन त्यांनी केले.

नकली पंतप्रधानांना घरी पाठवा – संजय राऊत

देशातील हुकूमशाही नष्ट करून नकली पंतप्रधानांना घरी पाठवा, असे आवाहन करीत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ही विराट रॅली म्हणजे महाविकास आघाडीची लाट आहे. हिम्मत असेल तर समोर येवून दाखवा, असे आव्हान यावेळी संजय राऊत यांनी विरोधकांना दिले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष नकली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत आहेत. पण, आज जो महासागर उसळलाय त्यातून चार जूनला शिवसेना नकली आहे की असली आहे, हे पंतप्रधानांना कळेल. आमच्या नादाला लागू नका, हा महाराष्ट्र आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ही शिवसेना आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

महायुतीचा एकही उमेदवार विजयाच्या पात्रतेचा नाही – जयंत पाटील

महायुतीत एकही उमेदवार विजयाच्या पात्रतेचा नाही, राज्यात आलीच तर महायुतीची एखादी जागा येवू शकते, इतका जनतेत असंतोष आहे असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. गुजरातचा कांदा निर्यात करून या सरकारने महाराष्ट्रावर अन्याय केला, यामुळे शेतकऱयांमधून रोष व्यक्त झाला. यानंतर कांदा निर्यातीच्या पूर्वीच्या निर्णयाचा आधार घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारे ट्वीट करून दिशाभूल केली. ही फसवाफसवी थांबविण्यासाठी मशाल, तुतारीला मतदान करून महाविकास आघाडीला विजयी करा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.