नसीम खान यांची नाराजी दूर; काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली भेट

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिल्याने पक्षाचे ज्येष्ठ नेते नसीम खान नाराज होते. पण पक्षश्रेष्ठींकडून त्यांची नाराजी दूर करण्याचे आदेश नेत्यांना दिले. त्यानंतर खासदार चंद्रकात हंडोरे, माजी मंत्री सुरेश शेट्टी, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी नसीम खान यांची भेट घेतली. या भेटीतील चर्चेनंतर नसीम खान यांची नाराजी दूर झाल्याचे सांगण्यात येते.

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्या नसीम खान यांनी पक्षश्रेष्ठाRकडे थेट नाराजी व्यक्त करताना पक्षाच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला होता.

वर्षा गायकवाड यांनीही त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच नसीम खान यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता पक्षाच्या तीन ज्येष्ठ नेत्यांनी नसीम खान यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांची नाराजी दूर झाली असून नसीम खान आता प्रचारात सक्रीय होतील, असे सांगण्यात आले.

वर्षा गायकवाड – प्रिया दत्त भेट

दरम्यान वर्षा गायकवाड यांनी आज माजी खासदार प्रिया दत्त यांची भेट घेतली.

संभाजी ब्रिगेडचा वर्षा गायकवाड यांना पाठिंबा

दुसरीकडे वर्षा गायकवाड यांना संभाजी ब्रिगेडने पाठिंबा जाहीर केला आहे. संभाजी ब्रिगेडच्या मुंबईतील पदाधिकाऱयांनी त्यांची भेट घेऊन हा पाठिंबा जाहीर केला.