जातीधर्माच्या आधारे वातावरणनिर्मिती करून लोकांना फसवले जातेय; भाजपच्या 400 पारच्या नाऱयावर मनेका गांधी यांचा घरचा अहेर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर जातीधर्माच्या आधारे वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला तर लोक हमखास फसणारच, अशा शब्दांत सुलतानपूरच्या खासदार आणि भाजपच्या उमेदवार मनेका गांधी यांनी मोदी सरकारला घरचा अहेर दिला आहे.

जातीधर्माच्या मुद्दय़ावर मते मागितली जात असल्याबद्दल विचारले असता जेव्हा पक्ष जातीच्या आधारावर उमेदवारी देतो तेव्हा जनतेसाठी निवडीचा मुद्दा राहातच नाही. आता प्रत्येक जण नोटावर मत देऊ शकत नाही. जनता काम     करणाऱयांनाच मते देते हाच माझा आजवरचा अनुभव आहे, असे मनेका गांधी एका मुलाखतीत म्हणाल्या. नव्या लोकांना जातीच्या नावावर उमेदवारी दिली जाते, जेणेकरून त्यांना जास्त मते मिळतील, हे चांगले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मी ज्योतिषी नाही

भाजपा 400 पार करेल का असा सवाल केला असता. या प्रकरणी मी काहीच सांगू शकत नाही. कारण मी ज्योतिषी नाही असे उत्तर मनेका गांधी यांनी दिले. दरम्यान, काम करणाऱयांमध्ये लढत व्हायला पाहिजे असे जनतेलाही वाटते, असेही मनेका गांधी म्हणाल्या.