
औंढा नागनाथ येथील औंढा-हिंगोली रोडवरील शासकीय दवाखान्याजवळ रात्री 10 ते 11 वाजेदरम्यान काही जण झटापट करत असल्याचे पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्यांना पकडून त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे 1 कोटी 14 लाख रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. तर 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
संभाजीनगर येथील एका महिलेची लातूर व नांदेड येथील विनोद शिंदे, केशव वाघमारे, सोमनाथ दापके, विलास वडजे, सुनील जग्वार या पाच जणांसोबत ओळख होती. या पाच जणांनी महिलेस 1 लाख रुपयांचे 3 लाख रुपये करून देतो, असे आमिष दाखविले. त्यासाठी महिलेने 10 लाख रुपये सोबत घेऊन संभाजीनगर येथून नांदेड गाठले. ती नांदेडवरून एका वाहनाने औंढा नागनाथकडे निघाली होती तर 40 लाख रुपयांच्या बनावट नोटा घेऊन खामगाव येथून पाच जण गाडीने औंढा नागनाथ येथे आले होते.
दरम्यान, औंढा नागनाथ येथील उपबाजार समितीच्या आवारात महिलेने 10 लाख रुपयांच्या नोटा आरोपींना दिल्या. त्या बदल्यात गाडीतील व्यक्तीने 40 लाख रुपयांच्या नोटांची बॅग महिलेकडे दिली. त्यानंतर आरोपी तिथून पसार झाले. औंढा ते हिंगोली रोडवरील शासकीय रुग्णालयासमोर आरोपींनी वाहन थांबवून नोटा मोजण्यास सुरुवात केली. यावेळी ही महिला त्यांच्या वाहनाबाहेर उभी होती. बॅगेतील 40 लाख रुपये बनावट असल्याचा संशय महिलेला आला. त्यामुळे महिला व त्या पाच जणांमध्ये वाद होऊन झटापट सुरू झाली.
त्यावेळी औंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड, प्रकाश आडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अफसर पठाण, जमादार संदीप टाक, माधव सूर्यवंशी, विलास पाईकराव, ज्ञानेश्वर गोरे, गणेश गायकवाड, विनायक सुपेकर, वसीम पठाण, हनुमान बेले, सचिन मस्के, विश्वनाथ मुकाडे, राहुल मोगले, रवि हरकाळ व अमोल चव्हाण हे पेट्रोलिंगवर असताना त्यांनी महिलेची विचारपूस केली असता महिलेने आपली फसवणूक झाल्याचे सांगत 40 लाख रुपये किमतीच्या बनावट नोटांची बॅग पोलिसांच्या हवाली केली. त्यानंतर पोलिसांनी महिलेसह काही जणांना ताब्यात घेतले.

घडलेल्या घटनेची माहिती हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांना दिली. पोलिसांनी तात्काळ मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्ह्यांची नाकाबंदी केली. नाकाबंदीमध्ये पोलिसांनी वाहनासह ज्ञानप्रकाश परमेश्वर जांगीड, लखन गोपाल बजाज व राहुल चंदुसिंग ठाकूर (रा. सर्व जण खामगाव) यांना ताब्यात घेतले. दरम्यान, व्हिडिओ कॉलिंगवरून आरोपींची ओळख पटल्यानंतर खामगाव पोलिसांनी आरोपींच्या घराची झाडाझडती घेतली असता त्यांच्या घरात 75 लाख रुपयांच्या बनावट नोटा व बनावट सोने सापडले. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे करीत आहेत. यामधील 2 फरार आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.





























































