महाविकास आघाडीचे बोम्मईंना खुले आव्हान, महामेळाव्यास बेळगावात जाणार; रोखून दाखवा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराजांसह महामानवांविषयी भाजपच्या नेत्यांकडून वारंवार अवमान होत आहे. तसेच सीमाप्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याकडून महाराष्ट्राला डिवचणारी वक्तव्ये होत आहेत. मात्र महाराष्ट्र तोडण्याचा हा डाव आम्ही उधळून लावू. 19 डिसेंबर रोजी बेळगावात होणाऱ्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्यास उपस्थित राहणार आहोत. धमक असेल तर बोम्मई यांनी रोखून दाखवावे, असे खुले आव्हान महाविकास आघाडीने दिले आहे.

कर्नाटक सरकारची सीमावासीयांवरील दंडेलशाही, तसेच भाजपच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वारंवार होत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधिस्थळी महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकास अभिवादन करून या निषेध आंदोलनास सुरुवात झाली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

यावेळी शिवसेना उपनेते व जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, आमदार जयश्री जाधव, आमदार राजू आवळे, आमदार राजेश पाटील आदी उपस्थित होते. याशिवाय बेळगाव येथून महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार मनोहर किणीकर, दिगंबर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, अरविंद नांगनुरी आदी सीमाबांधवही उपस्थित होते.