नरेंद्र मोदींना प्रचारासाठी महाराष्ट्रात यावे लागतंय, हाच मराठा समाजाचा विजय; मनोज जरांगे यांचा भाजपला टोला

लोकसभा निवडणुकांच्या दोन टप्प्यांचे मतदान झाले आहे. आता शिल्लक असलेल्या पाच टप्प्यांसाठी प्रचाराने वेग घेतला आहे. सर्वेक्षणांच्या अंदाजामुळे भाजपचे धाबे दणाणले असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या अनेक सभा महाराष्ट्रात आयोजित करण्यात आल्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वारंवार महाराष्ट्रात येत भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा लागत आहे. या सभांवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे.

लोकसभा निवडणुकीपासून आपण लांब आहोत. आमच्या समाजाला आरक्षण मिळाले नाही, तर आम्ही विधानसभेची तयारी करणार आहोत. मराठा समाजाने आता ठरवायचे आहे. समाजाचा आता नाईलाज झाला आहे. या निवडणुकीसाठी आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. जो सगेसोयरे या विषयाच्या बाजूने आहे. त्यांचा विचार करा. जो सगे सोयरे विषयाच्या बाजूने नाही त्यांना पाडा, त्यांना असे पाडा की त्यांच्या दोन तीन पिढ्या पुन्हा वर येऊ नये, असे आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहे.

नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात लक्ष देण्याची गरज नव्हती. मात्र, आता मोदी आणि भाजपला मराठा समाजाच्या एकीची भीती निर्माण झाली आहे. इथच मराठा जिंकला की, त्यांना प्रत्येक टप्प्यात मोदी यांना आणावे लागतय. म्हणजे त्यांना मराठ्यांची प्रचंड भीती असल्याचे दिसून येत आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांना यावे लागत आहे, हाच मराठा समाजाचा विजय आहे, असेही जरांगे पाटील म्हणाले.

अनेक ठिकाणी मराठ्यांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे. मराठा एकटे दुश्मन आहेत का फक्त? ते ही मराठ्यांच्या मागे का लागलेत? ओबीसी मतं मिळवायला काही ठिकाणी स्टंट होत आहे. हा स्टंट असू शकतो. त्यांनी काही ठिकाणी स्टंट करून सहानुभूती मिळवायला नको, असे त्यांनी म्हटले आहे. आम्ही नेहमी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.