
>> बापू सुळे
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात रेल्वेला यंदा दोन लाख 40 हजार कोटी रुपये एवढय़ा मोठय़ा निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे रेल्वेच्या एकूण प्रवाशांपैकी 30 टक्क्यांहून अधिक प्रवासी असलेल्या आणि सर्वाधिक महसूल देणाऱया मुंबईसह महाराष्ट्रालाही घसघशीत निधी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र महाराष्ट्राच्या वाटय़ाला केवळ साडेपाच टक्के एवढा तुटपुंजा निधी आला आहे. यावरून केंद्रातील मोदी सरकारच्या लेखी महाराष्ट्र ‘पाणीकम’ असल्याचे समोर आले आहे. तर केवळ पाच-दहा टक्के प्रवासी असलेल्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार या राज्यांना मात्र घसघशीत निधी दिला आहे. त्यामुळे केंद्राकडून महाराष्ट्राला दिल्या जाणाऱया या सापत्न वागणुकीबाबत रेल्वेच्या अधिकाऱयांबरोबरच प्रवाशांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.
देशभरात रेल्वेने दररोज सुमारे अडीच कोटी प्रवासी प्रवास करतात. त्यापैकी एकटय़ा महाराष्ट्रात जवळपास 85 लाखांहून अधिक प्रवासी आहेत. मुंबईत उपनगरीय लोकल प्रवाशांची संख्या मोठी आहे. तसेच देशाच्या कानाकोपऱयातून हजारो लोक मुंबईत येतात. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील रेल्वे सुविधा वाढविण्यासाठी मोठय़ा निधीची गरज आहे, मात्र केंद्र सरकारने त्याकडे साफ दुर्लक्ष करत केवळ 13 बजार 539 कोटी रुपये एवढय़ा निधीवर बोळवण केली आहे. तर एकूण प्रवाशांच्या केवळ आठ टक्क्यांच्या जवळपास प्रवासी संख्या असलेल्या भाजपशासित उत्तर प्रदेशला 17 हजार 507 कोटी रुपये, मध्य प्रदेशला 13 हजार 607 कोटी रुपये, बिहारला 8 हजार 505 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यावरून केंद्र सरकारची महाराष्ट्रावर वक्रदृष्टी असल्याचे दिसत आहे.
रेल्वेमंत्र्यांनी पळवला मोठा निधी
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ओडिशा राज्यासाठी तब्बल 10 हजार 12 कोटी रुपयांना निधी पळवला आहे. अश्विनी वैष्णव यांची जन्मभूमी राजस्थान असली तरी कर्मभूमी ओडिशा आहे. ते 1994 चे ओडिशा केडरचे सनदी अधिकारी आहेत. सध्या ते भाजपच्या कोटय़ातून ओडिशामधूनच राज्यसभेवर गेले आहेत. केवळ साडेचार कोटींच्या घरात लोकसंख्या असलेल्या ओडिशाला मोठा निधी मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात रेल्वे प्रवाशांची संख्या मोठी आहे. तसेच मुंबईतूनच रेल्वेला मोठा महसूल मिळतो. त्यामुळे महाराष्ट्राला मोठा निधी मिळायला हवा होता, पण केंद्राने तुटपुंजा निधी देऊन येथील लाखो प्रवाशांची एकप्रकारे थट्टाच केली आहे.
– नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ
राज्ये मिळालेला निधी
- उत्तर प्रदेश 17 हजार 507 कोटी
- मध्य प्रदेश 13 हजार 607 कोटी
- महाराष्ट्र 13 हजार 539 कोटी
- ओडिशा 10 हजार 12 कोटी
- बिहार 8 हजार 505 कोटी
- आंध्र प्रदेश 8 हजार 406 कोटी
- गुजरात 8 हजार 332 कोटी
- कर्नाटक 7 हजार 561 कोटी





























































