पंतप्रधान भटकती आत्मा कोणाला म्हणाले माहिती नाही; अजित पवारांची सावध भूमिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल पुण्यात सभा झाली. या सभेत त्यांनी भटकती आत्मा असा उल्लेख करत टीका केली. एवढया खालच्या पातळीवर टीका करण्यावरून मोदींवर नाराजी व्यक्त होत आहे. तसेच अनेक नेत्यांनीही पंतप्रधानांनी अशाप्रकारचे वक्तव्य करणे योग्य नाही, असे म्हटले आहे. पंतप्रधानांनी हा उल्लेख ज्येष्ठ नेत्याबाबत केल्याने संताप व्यक्त होत आहे. तर पंतप्रधानांनी हे वक्तव्य नेमके कोणाबाबत केले, ते माहिती नाही, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे.

पुण्यातील एका सभेत मोदी म्हणाले की, ज्यांची स्वप्ने पूर्ण होत नाहीत त्यांचे आत्मे भटकत राहतात. 45 वर्षांपूर्वी आपल्या महत्वाकांक्षापोटी सरकार अस्थिर करण्याच्या खेळाची त्यांनी सुरूवात केली. तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरता आली आहे. त्यानंतर राज्यातील अनेक मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळही पूर्ण करू शकले नाहीत. 1995 साली भाजप-शिवसेना युतीची सत्ता आल्यानंतर त्यावेळीही तो आत्मा त्या सरकारला अस्थिर करत होता. आता फक्त राज्याला नाही तर देशाला अस्थिर करण्याचे काम हा आत्मा करत आहे, अशी टीका मोदींनी शरद पवारांचे नाव न घेता केली. या विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून त्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. याबाबत अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील सभेत पंतप्रधान मोदी नेमके कोणाला भटकती आत्मा म्हणाले ते मला माहिती नाही. ते कोणाला म्हणाले, ते कळायला मी ज्योतिषी नाही. आता या नंतरच्या सभेत मोदी मला भेटतील तेव्हा ते भटकती आत्मा कोणाला म्हणाले आणि त्यांचा त्यामागचा उद्देश काय होता. हे त्यांना विचारणार आहे. त्यांनी उत्तर दिल्यावर त्याबाबतची माहिती आपण देणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.