
सामना प्रतिनिधी। माजलगाव
माजलगाव धरणात मामासोबत पोहायला गेलेल्या एका 12 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जियान बेग असे मृत मुलाचे नाव आहे.
शहरातील आयशा नगर भागात राहणारे कलीम बेग यांचा सातवीच्या वर्गात शिकणारा 12 वर्षीय मुलगा जियान हा आपला मामा खाजा खान बशीर खान राहणार रहमत नगर माजलगाव यांच्यासोबत माजलगाव धरणात पोहायला गेला होता. यावेळी मामाची त्याच्याच वयाची दोन मुले पण त्याच्यासोबत होती. ही सर्व जण धरणाच्या कडीला पोहत असताना जीयान दिसत नसल्याने आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत तो बुडाला होता. त्यानंतर आरडाओरडा करून आजूबाजूला पाहणाऱ्यांनी त्याला शोधून बाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले. दरम्यान तो मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.































































