अवघे चार दिवस उरले… ‘एसआयआर’चे बहुतांश काम शिल्लक; ठाणे, मुंबईतील लाखो मतदारांना स्थलांतराचा फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील लाखो मतदारांची नावे नव्या मतदार यादीतून वगळली जाण्याची दाट शक्यता आहे. कारण मतदार यादी विशेष पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेचे मुंबईतील काम अद्याप 60 टक्केही पूर्ण झालेले नाही. येत्या 8 ऑगस्टला या मोहिमेची अंतिम तारीख आहे. इतर जिल्ल्ह्यांमधील एसआयआर मोहिमेचे काम 80 टक्क्याहून अधिक पूर्ण झाले असताना मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे शहरात मात्र ही मोहीम अर्धवट राहणार की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

एसआयआर मोहिमेचा निवडणूक आयोगाकडून दैनंदिन आढावा घेतला जातो. आजपर्यंत या मोहिमेचे 74.4 टक्के काम राज्यात पूर्ण झाले आहे. मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे तसेच पुणे या महत्त्वाच्या शहरांमध्ये मात्र एसआयआर मोहीम थंडावल्यासारखी दिसत आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे या महानगरांमधील लोकांनी इतरत्र स्थलांतर केल्यामुळे त्यांची माहिती मिळवणे कठीण झाले आहे. या शहरांचा झपाटय़ाने विकास होत असल्याने त्याच प्रमाणात लोक इतरत्र स्थलांतरही करत आहेत. या स्थलांतरामुळे त्यांचे 2002मध्ये मतदान केल्याचे पुरावे मिळवणे कठीण झाले आहे. मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे या मोहिमेला 8 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

बीएलओंबाबत तक्रारींचा पाऊस

एसआयआर मोहिमेसाठी नेमण्यात आलेल्या बुथ लेवल अधिकाऱ्यांबाबत (बीएलओ) नागरिकांकडून तक्रारींचा पाऊस पडत आहे. बीएलओंना घरोघर जाऊन मतदाराची संपूर्ण माहिती तपासून खातरजमा करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत, मात्र बहुतांश बीएलओ हे सोसायटय़ांमधील कार्यालयांमध्ये बसूनच काम करत असल्याची तक्रार आहे. सोसायटय़ांमधील काही लोकांना हाताशी धरून अनेक बीएलओ मोबाईलवरून नागरिकांना संदेश पाठवून कार्यालयात बोलावून घेतात. आजारी व्यक्ती, वयोवृद्ध यांना चढउतार करणे जमत नसतानाही त्यांना कार्यालयात येण्याची सक्ती केली जाते. न आल्यास मतदार यादीतून नाव वगळले जाईल, अशी भीती घातली जात आहे. अनेक बीएलओ मतदारांचे पुनरीक्षण अर्जही नीट तपासत नाहीत. तसेच त्यांना योग्य मार्गदर्शनही करत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

इतके काम पूर्ण झाले…
मुंबई शहर 56.26 टक्के
मुंबई उपनगर 55.49 टक्के
ठाणे 48.69 टक्के
पुणे 61.06 टक्के
पालघर 63.47 टक्के
नागपूर 61.12 टक्के