घरकुलचे अनुदान न मिळाल्याने बेघर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मालवण

शासनाच्या रमाई घरकुल योजनेलाच घरघर लागल्याचे चित्र आहे. लाभार्थ्यांना केवळ पहिल्या टप्प्यातील अनुदान अदा करण्यात आले. त्यानंतर आठ महिने उलटल्यानंतरही उर्वरित अनुदान खात्यात जमा न झाल्याने साळेल जाधववाडी येथील शशिकांत वामन आचरेकर यांच्यावर बेघर होण्याची नामुष्की ओढावली आहे.

दरम्यान, आचरेकर कुटुंबीयांनी वाडीतील समाजमंदिराचा आसरा घेत आहे. मात्र समाजमंदिरही मोडकळीस आले असल्याने आचरेकर कुटुंबियांवर धोक्याची टांगती तलवार कायम आहे.

गतवर्षी रमाई घरकुल आवास योजनेसाठी शशिकांत आचरेकर यांनी पंचायत समितीकडे अर्ज केला. त्यानंतर त्यांना घर बांधणीचा प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यावेळी त्यांना पहिल्या टप्प्यातील 25 हजाराचा हप्ता बँक खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर दुसया आणि तिस-या टप्यातील अनुदात खात्यात जमा झाले नाही. त्यामुळे आचेरकर यांच्या घराचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही.

गेले आठ महिने शशिकांत आचरेकर हे त्यांच्या पत्नी, दोन मुलगे, सून व नातवासह वाडीतील समाजमंदिरात वास्तव्यास आहेत. परंतु सध्या हे समाजमंदिर मोडकळीस आले आहे. त्यामुळे आचरेकर कुटुंबियांवर आता बेघर होण्याची वेळ आली आहे. आचरेकर हे वृद्ध असून त्यांचा नातू तिसरीत शिक्षण घेत आहे. त्यामुळे घर बांधणीसाठी विलंब झाला असल्याने त्यांना धोकादायक बनलेल्या समाज मंदिरात राहावे लागत होते.