
सामना प्रतिनिधी । अलिबाग
‘प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा आणि प्रत्येक कुटुंबात शिवसैनिक’ या शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ब्रिदवाक्यानुसार अलिबाग तालुका शिवसेना प्रमुख राजा केणी यांनी आपले कार्य सुरू ठेवले आहे. पक्षवाढीसाठी त्यांचा झंझावात अलिबाग तालुक्यात जोरात सुरू असून माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून कुसुंबळे वाडी येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत केले.
विकासाच्या वाटेपासून अद्याप दूर राहिलेल्या कुसुंबळे वाडी येथील कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर विश्वास दाखवत आपण महेंद्र दळवी आणि राजा केणी यांच्या सदैव्य पाठीशी राहू असा विश्वास व्यक्त केला. महेंद्र दळवी यांचे कार्यकर्त्यांसह गावात आगमन होताच ग्रामस्थांनी त्यांचे उत्स्फुर्त स्वागत केले. या कार्यक्रमास शिवसेनेचे उपतालुका प्रमुख प्रकाश पाटील, शिवसेना पोयनाड विभाग संघटक महेंद्र पाटील, कुसुंबळे शाखा प्रमुख गजानन खरसंबळे, ज्येष्ठ नागरिक महादेव केणी, कुसुंबळे उपशाखा प्रमुख संदिप पाटील, आप्पा पिंगळे यांच्यासह गावातील महिला वर्ग व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

































































