लैंगिक अत्याचाराला विरोध केल्याने 7 वर्षीय मुलीला पेटवले, 19 वर्षीय तरुणाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लैंगिक अत्याचाराला विरोध केल्याने सात वर्षीय मुलीला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विजय कुमार असे 19 वर्षीय आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना तमिळनाडूतील थेनी जिल्ह्यात घडली आहे.

पीडित मुलगी तिसरीमध्ये शिक्षण घेत असून तिचे आई-वडील दुसऱ्या शहरामध्ये काम करतात. त्यामुळे पीडिता तिच्या आजीबरोबर राहते. आजी अंगणवाडीमध्ये पोषणआहर शिजवण्याचे काम करते. 2 जुलैला मुलीला सुट्टी असल्याने ती आजीबरोबर अंगणवाडीमध्ये गेली होती.

अंगणवाडीबाहेर असणाऱ्या मोकळ्या जागेमध्ये मुलगी खेळत होती. सकाळी अकराची वेळ असल्याने पीडित मुलीची आजी पोषणआहार शिजवण्याचे काम करत होती. अचानक मुलीच्या ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज आल्याने आजीसह अंगणवाडीतील इतर कर्मचाऱ्यांनी बाहेर धाव घेतली. पीडित मुलीने लैंगिक अत्याचारास विरोध केल्याने आरोपीला तिला पेटवून दिले होते.

आजीने आणि इतर कर्मचाऱ्यांनी पीडितेची आगीतून सुटका केली आणि तिला चिन्नमानूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. पीडिता 65 टक्के भाजल्याने प्राथमिक उपचारानंतर तिला थेनी येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. येथे उपचार घेतल्यानंतर तिला मदुराई येथील राजाजी सरकारी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विजय कुमार याला अटक केली असून त्याच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार कायदा आणि इतर आयपीसी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.