
सामना ऑनलाईन, मुंबई
प्रेयसीच्या पतीची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर कोलकाता सोडून मुंबईत येऊन लपलेल्या आरोपीच्या वडाळा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तो पोलिसांना गुंगारा देण्यासाठी वडाळ्यात कडिया काम करत होता.
वडाळा पोलीस एका गुह्याच्या तपासासाठी कोलकाता येथे गेली होती. तेव्हा आमच्या येथील हत्येचा आरोपी वडाळा परिसरात राहत असल्याची माहिती तेथील पोलिसांनी दिली होती. त्यानुसार मग वरिष्ठ पोलीस निरीक्षक गंगाधर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शंकर राऊत, अंमलदार राजाराम पांगारे नीलेश चौधरी, सुशांत टिळक, देवीदास पगारे, सुहास कांबळे या पथकाने वडाळ्यात कोलकात्यातील फरार आरोपी दालीम अल्लाउदीन शेख (35) याचा तपास सुरू केला. तेव्हा बंगालीपुरा येथे दालीम राहत असून कडिया काम करीत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याला पकडून कोलकाता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
बेहरामपूर परिसरात राहणाऱ्या दालीमचे मिथुन शिल (32) याच्या पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध होते. तसेच दालीमच्या आणखी एका मित्राचेदेखील मिथुनच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. या दोघांना मिथुन अडसर ठरत होता. त्यामुळे मित्राने मिथुनचा अडथळा दूर करण्यासाठी दालीमला एक लाखाची सुपारी दिली होती. त्यानुसार चार जणांना हाताशी घेऊन दालीमने मिथुनला गोळ्या झाडून ठार मारले होते. त्या गुह्यातील चौघांना पोलिसांनी पकडले होते, मात्र दालीम फरार होता. वडाळा पोलिसांनी दालीमला पकडून कोलकाता पोलिसांच्या स्वाधीन केले.






























































