
>>मंगल गोगटे
आजकाल प्राणी, पक्षी, झाडं, पाणी…एकूणच नैसर्गिक संपत्तीबाबत, त्याच्या अस्तित्वाबद्दल आणि जपणुकीबद्दल सर्वजण जागृत झाले आहेत. एखाद्या प्रकारच्या नैसर्गिक संपत्तीला धोका निर्माण होत आहे हे लक्षात आलं की, त्याबाबतची जागरुकता लगेच जागी होते, परंतु जी संपत्ती पूर्वीच नाहीशी झाली त्याचं काय? त्याबद्दल कितीही वाईट वाटलं तरी आता त्याचा काहीच उपयोग नाही, फायदा नाही.
अशा पैकीच एक आहे तस्मानियन वाघ. दुर्मिळ प्राण्यांच्या यादीत पहिल्या पाचात याची दखल घेतली जाते. खरं तर याला थायलेसिन असं म्हणत. तो खूपसा कुत्र्यासारखा दिसत असल्याने त्याला तस्मानियन लांडगा असंही म्हटलं जायचं. हा मूळचा ऑस्ट्रेलिया व न्यू गिनी देशातला, पण ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेकडील ‘तस्मानिया’ बेटामुळे त्याला हे नाव मिळालं. कारण असावं अर्थातच त्या बेटाचा आकार, जो या वाघाच्या तोंडासारखा आहे. याच्या पाठीवरचे चट्टे त्याची खास ओळख होती आणि ते नर व मादी या दोघांवरही सारखेच असायचे. शिवाय त्याच्या पोटाला कांगारूला असते तशी पिशवी होती. विशेष म्हणजे ही थैलीदेखील नर वा मादी, दोघांनाही असायची.
तस्मानियन वाघ हा मांसाहारी प्राण्यांच्या कार्निवोरस मार्सुपियल्स गटातील सर्वात मोठा प्राणी. त्याच्या श्वान जातीशी असलेल्या साम्यामुळे ग्रीक भाषेत त्याला “dog -headed pouched one” म्हणतात. शेवटचा तस्मानियन वाघ होता ‘बेन्जामिन’. त्याच्या शेवटच्या काळात त्याला ऑस्ट्रेलियाच्या हॉबर्ट या प्राणिसंग्रहालयात ठेवलं होतं, परंतु तिथे त्याची नीट काळजी घेतली न गेल्याने त्याचा शेवट अत्यंत वाईट अवस्थेत झाला. तस्मानिया भागातील हवामान दिवसा उष्ण, तर रात्री अत्यंत थंड असतं. त्यामुळे हे वाघ पहाटे किंवा संध्याकाळी शिकार करत. दिवसाच्या उष्णतेच्या काळात ते जंगलात अगदी आत जात, थंड जागा शोधून तिथे बसून राहत. याच्या अगदी उलट घडलं प्राणिसंग्रहालयात. बेंजामिनला सदासर्वकाळ एका पिंजऱयात ठेवण्यात आलं होतं. त्याला तिथलं हवामान मानवलं नाही आणि शेवटी त्याचा अंत झाला. तो दिवस होता 7 सप्टेंबर 1936. तो या ठिकाणी 3 वर्षे होता.
त्याचं बेंजामिन हे नावही त्याला मृत्यूनंतर दिलं गेलं असं म्हणतात. कारण तो गेल्यानंतर तो कसा मेला यावर चर्चा न होता तो नर होता की मादी यावरच जास्त चर्चा झाली. तेव्हापासून आजपर्यंत तस्मानियन किंवा थायलेसिन प्रजातीतील वाघाला बघितल्याच्या बातम्या अनेकदा आल्या आहेत, पण कोणालाही ते सिद्ध करता आलेलं नाही. अगदीच अलीकडे म्हणजे 2017 साली असा दावा करण्यात आला होता. या दाव्यामुळे तस्मानियन वाघ ‘सर्वात जास्त दावा करण्यात आलेल्या दुर्मिळ प्राण्यात’ अव्वल ठरला आहे.
गोष्टी इथेच संपत नाही. तस्मानियन वाघाच्या लुप्त होण्यामागे त्यावेळची परिस्थिती कारणीभूत असणार. त्या काळात हा वाघ रक्तपिपासू आहे, तो माणसांवर हल्ला करतो, नरभक्षक आहे, इत्यादीसारख्या खऱयाखोटय़ा कथांचं पीक आलं होतं. लोक त्याला ‘व्हँपायर डॉग’ असं म्हणत. त्या काळात त्याच्याबद्दलची ही जी माहिती पसरली होती ती या वाघाच्या जीवावर उठण्यासाठी पुरेशी होती. 20 व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत ही समजूत इतकी घट्ट बसली की, लोक तस्मानियन वाघांना संपवत गेले. यात शेतकऱयांचा मोठा सहभाग होता. कारण हा वाघ आपल्या गुराढोरांना संपवेल ही भीती त्यांच्या मनात होती.
तस्मानिया भागात नव्याने माणसं राहायला आल्याने तस्मानियन वाघांसाठी आणखी धोका निर्माण झाला. माणसं तर जीवावर उठली होतीच, नव्या माणसांमुळे जंगलं नष्ट झाली. याखेरीज या नव्या पाहुण्यांनी आपल्यासोबत आणलेले नवीन आजार या प्राण्यांना दिले. नव्या आजाराशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती नसल्याने वाघांची संख्या आणखी कमी होत गेली. तस्मानियन वाघाबद्दल असलेलं अज्ञान आणि पुरेशा संशोधनाअभावी हा प्राणी आज जगातून नष्ट झाला आहे. तो पुन्हा अस्तित्वात येईल का? हा आजही मोठा प्रश्न आहे.
‘तस्मानियन टायगर’ लोगो असलेला हा ब्रँड जगभरातील सैन्य, विशेष दल आणि पोलिसांसाठी उपकरणे आणि कपडय़ांचा सुप्रसिद्ध निर्माता आहे. गेल्या काही वर्षांत ही पंपनी उच्च गुणवत्तेचे, तांत्रिकदृष्टय़ा प्रगत, व्यावसायिक उपकरणे आणि कपडय़ांचे सर्वोत्तम पुरवठादार म्हणून प्रसिद्ध आहेत.



























































