
>> मंगल गोगटे
अलिबागजवळच्या कनकेश्वर गावात एका उंच डोंगरावर एक शिवमंदिर आहे. मी खूप लहान असताना माझ्या एका दूरच्या मावशीबरोबर (आणि तिच्या काही मैत्रिणींबरोबर) या देवळात गेले होते. तिथे त्या सगळ्यांनी मिळून पूजेसाठी मला तिथल्या गाभाऱ्यात पाठवलं होतं. तो माझा बाई व पुरुष असा देवासाठीचा भेदभाव समजण्याचा पहिला अनुभव होता. त्यानंतर मी ते सहजपणे स्वीकारलंही. धर्माच्या नावाखाली ते पाळताना मनात कधी प्रश्न आले नाहीत. माझ्याप्रमाणे सगळ्यांनीच ते जगण्याचा भाग म्हणून गृहीत धरलेलं होतं. सामाजिक चालीरीती ज्या सहजपणे चालत होत्या त्यांना धक्का देत चालण्याची पद्धत त्या काळात कधीच रुजली नाही.
आणि त्या काळापासूनच अशीही काही मंदिरं होती, जी फक्त स्त्रियांसाठी होती आणि पुरुषांना तिथे परंपरेने प्रवेशाची सक्त मनाई होती. आपल्या देशभरात मला माहीत असलेली ‘अशी’ किमान पाच मंदिरं आहेत. आपला देश देवळांचा देश आहे. मोठय़ा भव्य मंदिरांपासून ते अगदी साध्या झाडाखाली मूर्ती अशा देवळांपर्यंत सगळ्या प्रकारची देवळं इथे पाहायला आणि अनुभवायला मिळतात. खालील काही देवळं वर्षातील काही दिवस फक्त स्त्रियांसाठीच असतात आणि पुरुषांना आत प्रवेशासदेखील मज्जाव असतो.
केरळ राज्यातलं अट्टुकल भगवथी देऊळ हे अशांपैकीच एक. इथला एक महत्त्वपूर्ण सण अट्टुकल पोंगल या काळात हे मंदिर हजारो स्त्री भाविकांनी भरून जातं. ते इतकं भरतं की, ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने धार्मिक कारणासाठी भरलेला एकमेव मोठा जमाव असं याचं वर्णन केलं आहे. हा दहा दिवसांचा सण फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान साजरा केला जातो.
अगदी दुर्मिळ अशा ब्रह्मासाठीच्या मंदिरांपैकी एक आहे राजस्थानमधील ब्रह्माचं देऊळ. या देवळात लग्न झालेल्या पुरुष वर्गाला देवळाच्या गाभाऱयात येण्यापासून मनाई केली आहे. खरं तर देऊळ आहे पुरुष देवाचं, पण तरी आजही हा कायदा तेथे आहे. पुराणकथांनुसार ब्रह्मदेवाने त्याची पत्नी सरस्वतीसमवेत यज्ञ करणाचं योजिलं होतं, परंतु सरस्वतीला यायला उशीर झाल्याने विष्णूने देवी गायत्रीशी विवाह केला आणि पूजेचं काम उरकून घेतलं. त्यामुळे सरस्वती एवढी संतापली की, तिने समस्त पुरुष वर्गाला देवळात येण्याची बंदी केली. तरीही कुणी आलंच आत तर त्याचं वैवाहिक आयुष्य खराब होण्याचा शाप दिला.
आसाममधील कामाख्या देवळात वर्षातल्या काही दिवसांत देवळाच्या आवारातदेखील यायची बंदी घातली आहे. हे शक्तिपीठ नीलाचल डोंगरात आहे. इथला अंबुबाची मेळा किंवा अंबुबासी उत्सव दरवर्षी पावसाळ्यात असतो. या वर्षी तो 22 ते 26 जून या काळात भरवला जाणार आहे. या दिवसांमधे देवी कामाख्या तिच्या मासिक पाळीतून जात असल्याने मंदिर तीन दिवस बंद ठेवण्यात येते, असं सांगितलं जातं. हा उत्सव महिलांचे पुनरुत्पादक शरीर आणि नैसर्गिक चक्र यातील संतुलनाचा सन्मान करतो. या काळात देवळातील पुजारीदेखील फक्त स्त्रियाच असतात.
शक्तिस्थळ असलेलं मुझफ्फरनगर येथील मातामंदिरात देखील ज्यावेळी देवी मासिक पाळीतून जात असेल तेव्हा पुरुषांना देवळाच्या परिसरातदेखील प्रवेश करू देत नाहीत. फक्त स्त्रियांनाच प्रवेश असलेल्या या काळात पुजारीसुद्धा बायकाच असतात. देवी कन्याकुमारीचं मंदिर आपल्या देशात दक्षिणेकडील भागात आहे. इथे पुरुषांचं स्वागत कधीही केलं जात नाही. फक्त संन्याशी पुरुषांनाच इथे प्रवेश असतो, तोही फक्त मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंतच. या देवळात वसते देवी भगवती. एकूण 52 शक्तिपीठांपैकी हेही एक शक्तिपीठ आहे. पुराणं सांगतात की, दक्षाची मुलगी सती हिचा उजवा खांदा आणि पाठीचा कणा जिथे पडला ती जागा या देवळाच्या आत आहे. दुसऱया एका आख्यायिकेनुसार देवी पार्वतीला शिव देवाने त्यांच्या लग्नाच्या दिवशीच अपमानास्पद पद्धतीने वागवले आणि म्हणून पुरुषांना येथे प्रवेश बंदी आहे.





























































