
सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी
देवगड तालुक्यातील स्वयंचलित हवामान केंद्र बंद आहेत त्याचा फटका येथील आंबा व काजू बागायतदारांना बसत असून त्यांना नुकसान भरपाईपासून वंचित रहावे लागत असल्याचा आरोप सदस्य गणेश राणे यांनी कृषी समिती सभेत केला. यावर स्वयंचलित हवामान केंद्रे चालू आहेत की बंद याबाबतचा अहवाल पुढील सभेत सादर करण्याचे आदेश सभापती रणजीत देसाई यांनी सभेत दिले.
जिल्हा परिषद कृषी समितीची मासिक सभा येथील बॅ नाथ पै समिती सभागृहात सभापती तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा कृषी विकास अधिकारी सुधीर चव्हाण, समिती सदस्य अमरसेन सावंत, वर्षा पवार, अनुप्रिती खोचरे, महेंद्र चव्हाण, संजय देसाई, गणेश राणे, तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री पिक विमा योजना सन २०१७-१८ च्या नुकत्याच जाहीर झालेल्या नुकसान भरपाईत देवगड तालुक्यातील एकाही शेतकऱ्यांला आंबा नुकसान भरपाई मिळालेली नाही. यावर चर्चा झाली असता देवगड तालुक्यातील अनेक स्वयंचलित हवामान केंद्रे बंद आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना सन २०१७-१८ च्या पिक विमा योजनेच्या नुकसान भरपाई पासून वंचित रहावे लागले असल्याचा आरोप सदस्य गणेश राणे यांनी सभेत केला. त्याच प्रमाणे ही हवामान केंद्रे नावापुरती आहेत ती बंद असल्याने तापमानातील वाढ, ख़राब हवामान यांची अचूक नोंद होत नाही आणि त्याचा फटका येथील आंबा काजू बागायतदारांना बसत आहे. त्यामुळे या हवामान केंद्रांची सद्यस्थिति काय आहे याची माहिती सादर करण्याची मागणीही गणेश राणे यांनी सभेत केली. यावर चर्चा करताना स्वयंचलित हवामान केंद्रे चालू आहेत की बंद याबाबतचा अहवाल पुढील सभेत सादर करण्याचे आदेश सभापती रणजीत देसाई यांनी सभेत दिले.
शेतकरी सहलीचे नियोजन पूर्ण झाले असून ही सहल डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नेण्यात येणार आहे. सहलीसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करावी अशी माहिती देतानाच डिसेंबर मध्ये होणाऱ्या सिंधु कृषी पशुपक्षी प्रदर्शन मेळाव्यात कृषी क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती सभापती देसाई यांनी दिली.
नुकसानीचे पंचनामे करावेत : कृषी समिती सभेत ठराव
जिल्ह्यात नोव्हेंबर मध्ये अवकाळी पाऊस पडला असून यात आंबा काजू बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोहर येण्याच्या वेळी पाऊस पडल्याने आंब्याच्या झाला आता नव्याने पालवी फुटली आहे. आता त्या पालवी ला मोहर येईल हे सांगता येत नाही. एकंदरित जिल्ह्यातील आंबा काजू बागायतदर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी सदस्य अमरसेन सावंत यांनी सभेत केली. यावर तसा ठरावही कृषी समिती सभेत घेण्यात आला.































































