
मनसुख हिरेन हत्याकांडप्रकरणी एटीएसने दमण येथून एक व्होल्वो कार ताब्यात घेतली असून ती उल्हासनगर येथील बिल्डर मधू आणि मनीष बठिजा यांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही कार मनसुखच्या हत्येत वापरल्याचा संशय एटीएसला आहे. त्यामुळे बठिजा बिल्डर चौकशीच्या रडारवर आले आहेत. बठिजा हे भाजप नेत्यांचे अत्यंत निकटवर्तीय असून त्यामुळे मनसुख प्रकरणात आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे.
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात गाडय़ांचा वापर ‘लाइमलाइट’मध्ये आला आहे. याआधी एटीएसने स्कॉर्पिओ, इनोव्हा, दोन मर्सिडीज, एक प्रॅडो या आलिशान कार जप्त केल्यानंतर आता सोमवारी मध्यरात्री दमण येथून आणखी एक काळय़ा रंगाची व्होल्वो कार जप्त केली. ही कार ठाणे एटीएसच्या कार्यालयात आणण्यात आली. आज सकाळी एटीएस आणि फॉरेन्सिकच्या टीमने तिची कसून तपासणी केली.
या गाडीत निळय़ा व काळय़ा रंगाच्या दोन बॅगा तपास पथकाला सापडल्या. बॅगांमधून सफेद शर्ट, निळी जीन्स पॅण्ट आणि सफेद शाल सापडली. गाडीत काही औषधांच्या व पाण्याच्या बाटल्याही आढळल्या. ही कार सचिन वाझे वापरत असल्याचा संशय एटीएसने व्यक्त केला आहे.
ही काळी व्होल्वो कार उल्हासनगर येथील बिल्डर मधू आणि त्यांचा मुलगा मनीष बठिजा यांची असल्याचे उघड झाले आहे. बठिजा हे भाजप नेत्यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. त्यांनी ही गाडी विकल्याचा दावा केला आहे. मात्र ही गाडी बठिजा यांच्याच ‘सुपर स्ट्रक्चर’ या पंपनीच्या नावे रजिस्टर असून ती विकल्याचा कोणताही व्यवहार कागदोपत्री झालेला नाही.
वाझेकडे बनावट आधार कार्ड
निलंबित एपीआय सचिन वाझे याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. एनआयएच्या हाती एक आधार कार्ड लागले असून त्या आधार कार्डच्या आधारे सचिन वाझे याने ट्रायटंड हॉटेलमध्ये रूम घेतली होती. त्या आधार कार्डावर सचिन वाझे याचा फोटो असून नाव मात्र सुशांत सदाशिव खामकर याचे आहे. म्हणजेच वाझे याने बनावट आधार कार्डच्या आधारे ट्रायडंटमध्ये रूम बुक केली आणि तेथे तो 16 ते 20 फेब्रुवारीदरम्यान राहिला.
वाझेचा फोटो आणि सुशांत खामकरचे नाव असलेल्या त्या बनावट आधार कार्डावर 782528575822 हा नंबर असून हे बनावट आधार कार्ड ट्रायडंट हॉटेलात सापडल्याचे एनआयए सूत्रांकडून समजते तसेच हॉटेलच्या सीसीटीव्हीत वाझे सोबत एक महिलादेखील दिसत आहे. शिवाय वाझेकडे तेव्हा दोन बॅगासुद्धा होत्या, असे सांगण्यात येते.
कार मॅटरवरची वाळू मुंब्रा खाडीची?
फॉरेन्सिक टीम आणि एटीएसने कारच्या केलेल्या झाडाझडतीचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या कारच्या मॅटवर वाळूही सापडली. ही वाळू मुंब्रा रेतीबंदर खाडीपात्रातील आहे की दुसऱया ठिकाणची याचाही वेगळा तपास केला जाणार असून त्याआधारेच मनसुख हत्येत ही गाडी वापरली होती का हे स्पष्ट होणार आहे.
बठिजांचे भाजप कनेक्शन
बिल्डर मधू बठिजा आणि त्यांचा मुलगा मनीष यांचे भाजप नेत्यांशी घट्ट राजकीय आणि व्यावसायिक कनेक्शन आहे. याच मनीष बठिजा बिल्डरच्या पॅराडाइज ग्रूपला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना नवी मुंबई विमानतळानजीकची सोन्याच्या भावाचा 24 एकर ‘प्राइम’ भूखंड पडेल भावात आंदण दिला होता. मनीष बठिजा हा फडणवीसांच्या निकटवर्तीयांपैकी एक असून फडणवीसांचे लाडके प्रसाद लाड यांचा व्यावसायिक पार्टनरही असल्याचे समजते.
नवी मुंबईतील सुमारे 1767 कोटी रुपयांची ही जमीन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या 3.6 कोटी रुपयांत मनीष भठिजा यांच्या घशात घातली, असा आरोप सातत्याने झाला होता. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माध्यमांमध्ये वेगवेगळय़ा राजकीय भूमिका उठत असताना पोलीस तपासात मात्र वेगळी तथ्ये सामोरी येत आहेत. या प्रकरणातले इतर पुरावे आता महाराष्ट्र पोलिसांच्या तपासामुळे बोलू लागले आहेत.




























































