
कळव्याच्या खारेगाव येथील झोपड्यांना आज सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत जवळपास ५ झोपड्या अक्षरशः जळून खाक झाल्या आहेत. एका मिनी गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन झोपड्यांना आग लागली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. जेव्हा आग लागली तेव्हा झोपड्यांमध्ये कोणीही नव्हते, त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. दरम्यान तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या झोपड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कळवा येथील खारेगाव परिसरातील सहयोग सोसायटीच्या मागे असलेल्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात बेकायदा पद्धतीने झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. या झोपड्यांना सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच ठाणे पालिकेचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जवाहरबाग अग्निशमन दलाच्या जवानांनी एका अग्निशमन वाहनासह दोन बचाव वाहनांच्या मदतीने आग विझविण्याचे काम सुरू केले. स्थानिक नागरिक, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नांनंतर साडेदहा वाजता आग पूर्णपणे विझविण्यात आली. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वाय.एम. तडवी, कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त ललिता जाधव, अग्निशमन दलाचे अधिकारी, कळवा पोलीन आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
आगीचे कारण अस्पष्ट
कळवा, मुंब्रा आणि दिव्यातील बेकायदा झोपड्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. दरम्यान आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही आग कशामुळे लागली? कोणी मुद्दामहून लावली का याचा तपास सुरू आहे. अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि स्थानिकांच्या मदतीने सुमारे तासाभरात आग पूर्णपणे विझविण्यात आली.
































































