एमबीबीएसच्या शंभर जागांना ‘आयुर्विज्ञान’ची मंजुरी, सातारा वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या शंभर जागांना राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता सातारा वैद्यकीय महाविद्यालय आगामी वर्षापासून सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने नुकतेच सातारा जिल्हा रुग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना पत्र पाठवून सातारा वैद्यकीय महाविद्यालयासाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या शंभर जागांना मंजुरी देत असल्याचे कळविले आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम होईल. शिवाय एमबीबीएसच्या शंभर जागा निर्माण झाल्याने वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होणार आहे, असेही बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

या महाविद्यालयासाठी जलसंपदा विभागाची कृष्णानगर परिसरातील 64 एकर जागा देण्यात यावी, त्याबदल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यातील खाकली गावातील 70 एकर शासकीय जमीन जलसंपदा विभागाला हस्तांतरित करण्यात यावी, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधान परिषद सभापतींच्या दालनात आयोजित विशेष बैठकीत घेण्यात आला. वैद्यकीय महाविद्यालय ही सातारावासीयांची गरज असल्याने त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. इमारतीचे बांधकाम हे कलात्मक, दर्जेदार, पुढील शंभर वर्षांचा विचार करून करण्यात यावे, अशा उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना असून त्यानुसार महाविद्यालयाच्या कामाने वेग घेतला आहे, असेही बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांनी मानले उपमुख्यमंत्र्यांचे आभार

अर्थसंकल्पात घोषणा केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियमित बैठका आयोजित करून हे महाविद्यालय वर्षभरात सुरू होण्यासाठी प्रयत्न केले. महाविद्यालयास जागा उपलब्ध करण्यापासूनचे सर्व अडथळे उपमुख्यमंत्र्यांनी दूर करून आगामी वर्षापासून हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग सुकर करून दिला. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी त्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

…तोपर्यंत जिल्हा रुग्णालयाचा वापर

महाविद्यालयासाठी नवी इमारत उपलब्ध होईपर्यंत जिल्हा रुग्णालय व आरोग्य यंत्रणेचा उपयोग करून आगामी शैक्षणिक वर्षापासून जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाचे कामकाज करण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. जानेवारी 2012 मध्ये साताऱ्यासाठी 419 कोटी रुपये खर्चाचे 100 खाटांचे वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न 500 खाटांचे रुग्णालय मंजूर होऊनही पुढील कार्यवाही झाली नव्हती. तथापि, शहरवासीयांची गरज लक्षात घेऊन अजित पवार यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला, असे त्यांनी सांगितले.