मीनाक्षी मंदिराची 60 कोटींची जमीन हडपली, 19 जणांविरोधात गुन्हा दाखल, तपास सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मदुराई येथील प्रसिद्ध मीनाक्षी मंदिराशी संबंधित एका धर्मादाय संस्थेची 1.79 एकर जमीन बनावट पद्धतीने हडप केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या जमिनीची बाजारभावानुसार किंमत तब्बल 60 कोटी रुपये इतकी आहे. मदुराई सिटी सेंट्रल क्राइम ब्रांचने याप्रकरणी 19 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ही जमीन लाटण्यासाठी आरोपींनी जमिनीच्या बनावट हस्तांतरण, नोंदणी आणि गहाण व्यवहारांद्वारे जमीन हडपण्याचा कट रचला होता. ही कारवाई मंदिराचे संयुक्त आयुक्त आणि कार्यकारी अधिकारी सेल्लादुरई आणि भ्रष्टाचारविरोधी संस्था ‘अरापोर इयक्कम’ यांच्या तक्रारीवरून करण्यात आली आहे. 1930 मध्ये सैदापेट उप-निबंधक कार्यालयात एक मृत्युपत्र नोंदवले गेले होते. त्यात स्पष्ट म्हटले होते की, अलगार कोविल रोडवरील अशोक विलास बंगला आणि त्याला लागून असलेला बगिचा मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिर आणि अलगार मंदिरासाठी स्थापन केलेल्या धर्मादाय संस्थेचा आहे. मृत्युपत्रात केवळ जमीन भाडेपट्टय़ावर देण्याची परवानगी होती, तर तिची विक्री, गहाण किंवा मालकी हक्क हस्तांतरित करण्यावर पूर्णपणे बंदी होती.