सरकारी योजनेमधील घरे मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवाफसवी, 25 हून अधिक लोकांना कोटय़वधींचा चुना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

म्हाडा, सिडको, झोपु योजनेतील घरं मिळवून देतो अशी बतावणी करत नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भामटय़ाला शीव पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. शरद पेडणेकर (50) असे त्याचे नाव असून त्याने 25 हून अधिक नागरिकांंची कोटय़वधींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

मंत्रालयात माझ्या चांगल्या ओळखी आहेत. मोठमोठय़ा अधिकाऱ्यांकडून मी काम करून घेतो, असे सांगत शरद नागरिकांवर छाप पाडण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या बतावण्या करून विश्वास संपादन करतो. दिनकर (नाव बदललेले) यांना घर घ्यायचे असल्याचे शरदला समजले. जुलै महिन्यात दिनकर आणि शरद एकमेकांना भेटले. तेव्हा एसआरए योजनेतून घर मिळवून देतो असे सांगत शरदने दिनकर यांच्याकडून नऊ लाख रुपये घेतले. त्यानंतर शरदने दिनकर यांच्या पत्नीच्या नावाने एसआरएचे बनावट अलोटमेन्ट पत्रदेखील दिले. दरम्यान, शरदने आपली फसवणूक केल्याचे समजताच दिनकर यांनी शीव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून एपीआय प्रदीप सालेकर आरोपीचा शोध घेत होते. अखेर तो पोलिसांच्या हाती लागला. शरदने शहरातील अनेकांना सरकारी योजनेतील घर मिळवून देतो असे सांगत कोटय़वधी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे