
मंत्रालयातील अधिकाऱ्याला केलेल्या मारहाण प्रकरणात प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्यावर आता अटक वॉरंटची टांगती तलवार आहे. अपघातात जखमी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल झालेले कडू यांना शनिवारी सत्र न्यायालयाने एक दिवस गैरहजेरीसाठी सूट दिली. मात्र पुढील सुनावणीला हजर राहण्यासाठी ताकीद दिली. गैरहजेरीसाठी सूट एक दिवसापुरती आहे, असे न्यायालयाने बजावले. त्यामुळे कडू यांना अटक वॉरंट टाळण्यासाठी पुढच्या सुनावणीला हजेरी लावणे आवश्यक आहे.
कडू यांनी न्यायालयात व्यक्तीशः हजर राहण्यासाठी मागील सुनावणीवेळी नोटीस बजावण्यात आली होती. त्या नोटीशीनंतरही कडू यांनी दांडी मारल्यामुळे सत्र न्यायालय चांगलेच संतापले होते. मात्र काही दिवसांपूर्वी अपघातात ते जखमी झाले आहेत. त्याकडे लक्ष वेधत कडू यांच्या वकिलांनी शनिवारी एका दिवसाच्या गैरहजेरीसाठी सुट मागितली. ही विनंती सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी मान्य केली. मात्र 15 फेब्रुवारीच्या पुढील सुनावणीला हजर राहण्याची सक्त ताकीद दिली. 26 सप्टेंबर 2018 रोजी एका सरकारी पोर्टलला विरोध करीत आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी बच्चू कडू यांनी मंत्रालयात असलेले तत्कालीन संचालक प्रदीप जैन यांच्यासोबत बाचाबाची करून त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कडू यांच्याविरुद्ध मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आरोप निश्चितीसाठी सध्या सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
यापूर्वीही बजावले होते अजामीनपात्र वॉरंट
बच्चू कडू यांनी याआधीही सत्र न्यायालयातील सुनावणीला वारंवार गैरहजेरी लावली आहे. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले होते. त्यानंतर अटकेच्या भितीने कडू यांनी न्यायालयात हजेरी लावून वॉरंट रद्द करून घेतले होते. त्यावेळी त्यांना अटकेच्या कारवाईपासून तात्पुरता दिलासा मिळाला होता. आता पुन्हा या प्रकरणात दांडी मारण्याचे सत्र सुरू केल्यामुळे कडू यांच्याविरुद्ध वॉरंटची टांगती तलवार आहे.

































































