इस्त्रोने चांद्रयान 2 मोहीम पुढे ढकलली; चीनचे चांगी 4 चंद्राच्या कक्षेत दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बंगळुरू

इस्त्रो 3 जानेवारीला चांद्रयान 2 मोहीम लाँच करणार होती. मात्र, आता इस्त्रोने ही मोहीम पुढे ढकलली आहे. चीनचे अंतराळयान चांगी 4 रविवारी चंद्राच्या कक्षेत दाखल झाल्यानंतर इस्त्रोने मोहीम पुढे ढकलल्याची घोषणा केली आहे. आतापर्यंत चंद्राच्या ज्या भागात अंतराळयान उतरले नाही, त्या भागात चांगी 4 उतरणार आहे. इस्त्रोने ही मोहीम पुढे ढकलली असली तरी या मोहीमेची पुढील तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. चंद्राची ‘डार्क साइट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात चांद्रयान 2 उतरण्यासाठी इस्त्रोकडे 16 फेब्रुवारीपर्यंतची वेळ आहे. त्यामुळे 16 फेब्रुवारीच्या आधी इस्त्रोला ही मोहीम हाती घ्यावी लागणार आहे.

चांद्रयान 2 मोहीम लवकरच लाँच करण्यात येईल, असे इस्त्रोने जाहीर केले आहे. मात्र, या मोहीमेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून विविध उपग्रह प्रक्षेपणाच्या कामात गुतंल्याने चांद्रयान मोहीम पुढे ढकलण्यात आल्याचे इस्त्रोने सांगितले.येत्या 10-12 दिवसात या मोहिमेची घोषणा करण्यात येईल, असे इस्त्रोचो अध्यक्ष सिवन के. यांनी सांगितले. चांगी 4 आणि चांद्रयान 2 मध्ये सगळ्यात आधी चंद्रावर कोण उतरणार याची स्पर्धा होती. आता चांगी पृथ्वीपासून दूर असलेल्या चंद्राच्या भागात उतरणार आहे. तर चांद्रयान चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरणार आहे. चंद्राच्या या भागाबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे या मोहिमेमुळे चंद्राच्या या भागाबाबत अधिक माहिती मिळणार आहे.

चांगी 4 रविवारी चंद्राच्या कक्षेत दाखल झाल्याची माहिती चीनच्या शिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिली आहे. मात्र, चांगी चंद्रावर कधी उतरणार याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही. इस्त्रोनेही आता चांद्रयान 2 मोहीमेच्या तयारीला गती दिली आहे. ही मोहीम 2017 आणि 2018 मध्ये पुढे ढकलण्यात आली होती. चंद्राच्या डार्क साइटवर चांद्रयान 2 उतरण्यासाठी इस्त्रोकडे 16 फेब्रुवारीपर्यंत वेळ आहे. त्यामुळे 16 फेब्रुवारीच्या आधी चांद्रयान लाँच केले जाईल, असे सिवन यांनी सांगितले. या मोहिमेचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या मोहिमेमुळे चंद्राच्या ज्या भागाची माहिती मिळालेली नाही, ती माहिती मिळणार असल्याचे सिवन यांनी सांगितले.