
गेल्या काही वर्षांमध्ये आरेमध्ये अचानक आगी लागण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. तसेच आगीच्या घटनांनंतर त्या ठिकाणची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती घेण्यात यावी, असे पत्र आमदार रवींद्र वायकर यांनी वरळी दुग्धशाळा आयुक्तांना पाठवले आहे.
जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील आरे कॉलनी, गोरेगाव पूर्व येथे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून मार्च 15 पर्यंत जवळजवळ 15 हून अधिक आकस्मित आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. अग्निशमन दलाच्या अहवालानुसार आरेमध्ये वर्षभरात 27 वेळा आगी लागल्याचे नमूद करण्यात आले आहे. या ठिकाणी आगी लागतात की लावल्या जातात की जागा बळकावण्याचा प्रयत्न होतोय, याची सखोल चौकशी आरे प्रशासनाकडून करण्यात यावी. यात जर कुणी दोषी सापडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे वायकर यांनी पत्रात नमूद केले आहे.
अग्निशमन केंद्र पुन्हा सुरू करा
आरेमध्येच चित्रनगरी असल्याने चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी उभारलेले अनेक सेटस् शूटिंग संपल्यानंतर काढून आरेच्या परिसरातच टाकले जातात, असेही निदर्शनास येत आहे. आरेच्या ज्या ज्या भागांमध्ये अचानक आगी लागल्या आहेत, त्या भागाची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती आरे प्रशासनाने घ्यावी.
आरेमधील 800 एकर जागा महाराष्ट्र शासनाने जंगल म्हणून घोषित केल्याने या वनक्षेत्राच्या सुरक्षेसाठी अग्नी व्यवस्थापन योजना राबविणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. यामुळे सुरुवातीस आरेमध्ये अग्निशमन केंद्र होते ते पुन्हा सुविधांसहित सुरू करण्यात यावे, जेणेकरून येथे अचानक लागणाऱया आगीच्या घटनांवर वेळीच नियंत्रण मिळविणे शक्य होईल तसेच जंगलाची हानी होणार नाही, असेही वायकर यांनी पत्रात नमूद केले आहे.





























































