
आपल्या आवडत्या कलाकारावर प्रेम त्यांचे चाहते अनेक मार्गांनी व्यक्त करतात. फोटो, सह्यांपासून ते कलाकारांच्या नावाने मंदिरंही बनवली जातात. मात्र, एका चाहतीला कलाकारावरचं प्रेम चांगलंच महागात पडलं आहे.
पोलंडमध्ये एका मॉडेल तरुणीला आपल्या आवडत्या रॅपरप्रमाणे दिसण्याची फार मोठी किंमत चुकवावी लागली आहे. अॅलेक्झांड्रा सडोव्स्का असं या तरुणीचं नाव आहे. प्रसिद्ध रॅपर पोपेकसारखं दिसण्याच्या नादात तिला आता आयुष्यभराचं अंधत्व आलं आहे. त्याचं झालं असं की, पोपेकची चाहती असलेल्या अॅलेक्झांड्राला तिच्यासारखं दिसायचं होतं. पोपेकप्रमाणे काळे डोळे हवे असल्याने तिने चक्क डोळ्यात टॅटू करण्याचा निर्णय घेतला.
टॅटूच्या या प्रकाराला आयबॉल टॅटू म्हणतात. या टॅटूला रेखाटण्यासाठी बुब्बुळांमध्ये शाई टोचली जाते. ज्यामुळे डोळ्यांचा रंग बदलून काळा होतो. पोपेकसारखं दिसण्याच्या वेडापायी अॅलेक्झांड्रा पोलंड येथील पिओटर ए पायोत्र नावाच्या एका टॅटूवाल्याकडे गेली. त्याने तिच्या डोळ्यात शाई टोचली देखील. पण, त्याचा भलताच परिणाम दिसू लागला. सुरुवातीला टॅटू काढल्यानंतर होतात तशा वेदना तिला होऊ लागल्या. पायोत्र याने तिला ते अतिशय सामान्य लक्षण असून वेदनाशामक औषधांनी वेदना दूर होते, असं सांगितलं होतं. मात्र, त्या वेदना कमी झाल्यातर नाहीतच, पण अॅलेक्झांड्राला एका डोळ्याने दिसायचं बंद झालं.
अॅलेक्झांड्राने ताबडतोब वैद्यकीय मदत घेतली. त्यावेळी या प्रकाराचा उलगडा झाला. पायोत्रकडून तिच्या डोळ्यात टॅटू काढतेवेळी एक भयंकर चूक झाली होती. त्याने शरीरावर गोंदवण्यासाठी वापरण्यात येणारी शाई तिच्या डोळ्यांसाठी वापरली होती. ही शाई डोळ्यांसाठी घातक मानली जाते. त्यामुळे अॅलेक्झांड्राची दृष्टी गेली. डॉक्टरांनी असा दावा केला आहे की ही शाई खूप आत गेल्यामुळे डोळ्याच्या अंतर्पटलाला दुखापत झाली आहे. त्यामुळे आता अॅलेक्झांड्रा कधीच एका डोळ्याने पाहू शकणार नाही.