देशात सातत्याने पेपर लीक होतात. आता ‘नीट’ अर्थात वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षा आणि नेट-यूजीसीचे पेपर लीक झाले असून एक पेपर रद्दही झाला. त्यामुळे नीट आणि नेट परीक्षा देणारे देशभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मोदी रशिया आणि युव्रेन यांच्यातील युद्ध थांबवू शकतात, पण काही कारणांमुळे पेपरफुटी थांबवू शकत नाहीत, असा सणसणीत टोला त्यांनी मोदींना लगावला.
मणिपूरपासून ते महाराष्ट्रापर्यंत आम्ही ‘भारत जोडो न्याय यात्रा’ काढली. यात्रेदरम्यान हजारो तरुणांनी पेपरफुटीची समस्या माझ्यापुढे मांडली. आज नीट आणि यूजीसी नेटचे पेपर लीक झाले आणि एक रद्दही झाला. मोदींनी एक ऑर्डर देऊन रशिया आणि युव्रेनचे युद्ध थांबवले होते. इस्रायल आणि गाझादरम्यान जे युद्ध सुरु होते तेदेखील त्यांनी थांबवले होते, असे म्हटले जाते, पण हिंदुस्थानात पेपर लीक होत आहेत ते मोदी थांबवू शकत नाहीत किंवा त्यांना ते थांबवायचे नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. या परीक्षांसाठी तुम्ही वर्षभर प्रचंड मेहनत करता, पण पेपरफुटीद्वारे तुमच्या भविष्याशी खेळले जात आहे. मध्य प्रदेशात व्यापम झाले. आता त्या व्यापमला मोदी आणि त्यांचे सरकार संपूर्ण देशात पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.
मोदी नावाची संकल्पना कालबाह्य
नरेंद्र मोदी नावाच्या संकल्पनेची सुरुवात गुजरात मॉडेलपासून झाली. हजारो कोटी रुपये खर्च करून मार्पेटिंग करणे आणि सरकारी यंत्रणेचा वापर करून भीती निर्माण करणे, अशी ही संकल्पना होती, परंतु आता देशात कुणीच मोदींना घाबरत नाही. जी 56 इंचाची छाती होती ती आता 30-32 वर आली आहे. याचा मानसिक परिणाम मोदींवर झाल्याचा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला.
… म्हणून मोदींवर चप्पल फेकली
मोदींची भीती संपल्यामुळेच वाराणसीमध्ये त्यांच्या ताफ्यावर चप्पल फेकण्यात आली, असेही राहुल गांधी म्हणाले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा स्वभाव सर्वांना आवडणारा होता. त्यांनी नक्कीच या सर्वातून मार्ग काढला असता, पण मोदींची शैलीच अशी आहे की ते कुणाचेच ऐकून घेत नाहीत. माझा मार्ग हाच सर्वोत्तम मार्ग अशी त्यांची हेकेखोर वृत्ती असते, त्यामुळे येणाऱया काळात त्यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढणार असल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला.
शिक्षण संस्था भाजप आणि आरएसएसच्या ताब्यात
देशभरातील शिक्षण संस्था भाजप आणि आरएसएसच्या पॅरेंट ऑर्गनायझेशनने पॅप्चर केल्या आहेत. त्यासाठी नरेंद्र मोदी यांनीच प्रोत्साहन दिले. प्रत्येक पदावर त्यांच्याच लोकांची नियुक्ती होते. त्यामुळेच पेपरफुटी होत आहे, असा सनसनाटी आरोपही राहुल गांधी यांनी मोदींवर केला. जोपर्यंत हे पॅप्चर थांबवले जात नाही तोपर्यंत पेपरफुटी थांबणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले. पेपरफुटी एक राष्ट्रविरोधी ऑक्टिव्हीटी असून त्यामुळे देशातील तरुणांना त्याचा परिणाम भोगावा लागत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात
भाजपने शैक्षणिक संस्थांवर आपली माणसे नियुक्त केली. पेपरफुटीवर या लोकांकडून कुठल्याच प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही. अक्षरशः सुमार लोक शैक्षणिक संस्थांवर नियुक्त केल्यामुळेच विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. पेपरफुटीप्रकरणी चौकशी सुरू आहे. एक परीक्षा रद्द झाली आहे. परीक्षा पुढे होईल की नाही ते माहीत नाही. मात्र या पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्यांना अटक करून तुरुंगात डांबले पाहिजे, असेही राहुल गांधी म्हणाले.
नेटचा पेपर डार्कनेटवर लीक झाला – धर्मेंद्र प्रधान
यूजीसी-नेटचा पेपर डार्कनेटवर लीक झाला. त्यामुळे परीक्षा रद्द करावी लागली, अशी माहिती शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली. प्रशासनाच्या व्यवस्थेवर विश्वास ठेवा. कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा परीक्षेतील अनियमितता सरकार खपवून घेणार नाही, असेही धर्मेंद्र प्रधान म्हणाले. ‘नीट’ परीक्षेचे राजकारण करू नका. एखाद्दुसऱया घटनेमुळे परीक्षा योग्य प्रकारे उत्तीर्ण झालेल्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम व्हायला नको, असे ते म्हणाले. राष्ट्रीय परीक्षा संस्थेची कार्यप्रणाली सुधारण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात ईपी सेंटर
विविध शिक्षण संस्थांवर भाजपने आपल्या विचारांची माणसे आणून बसवली आहेत. जे आधी निष्पक्षपाती असायचे ते आता वैचारिक झाले आहेत. सर्वांना माहीत आहे याचे ईपी सेंटर आधी मध्य प्रदेश येथे होते. तिथे 40 ते 50 लोकांची हत्या झाली होती. आता गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात याचे ईपी सेंटर आहे. भाजपचे लोक म्हणतात आमची प्रयोगशाळा गुजरात आणि मध्य प्रदेशात आहे. तिथून पेपरफुटीसारख्या घटना पसरत चालल्या आहेत. हिंदुस्थानातील सर्व संस्थांना पॅप्चर करून ठेवले आहे. हे जोपर्यंत होत राहील तोपर्यंत पेपरफुटीसारख्या घटना घडतच राहणार, असा दावाही राहुल गांधी यांनी केला.