प्रेयसीवर खर्च करण्यासाठी रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव, घरच्यांना मागितली 2.5 लाख खंडणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यात एक नविन घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या प्रेयसीचा खर्च उचलण्यासाठी स्वत:च्याच अपहरणाचा डाव आखला आणि घरच्यांकडे अडीच लाख रुपयांची खंडणी मागितली. पोलीस या घटनेचा तपास करत असताना ही माहिती समोर आली आहे. या घटनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी आरोपी तरुणाने एका मोबाइल अॅपचा आधार घेतला होता. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तुरुंगात टाकले आहे.

भिंडच्या गोहद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरेंद्र सिंह कुशवाह नावाच्या व्यक्तीने 6 नोव्हेंबर रोजी आपला 18 वर्षाचा मुलगा संदीप बेपत्ता असल्याची तक्रार दिली. तो घरून निघाल मात्र घरी परतला नाही असे या तक्रारीत म्हटले होते. 8 नोव्हेंबर रोजी पीडित वडिलांना एक फोन आला. त्यावेळी त्यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले असून अडीच लाख रुपये दिल्यानंतरच त्याची सुटका करण्यात येईल असे फोनवरून सांगण्यात आले. पीडित वडिलांनी या फोनवरील धमकीची माहिती पोलिसांना कळवली.

पोलिसांनी या दिशेने तपास करण्यास सुरुवात केली. त्याच्या जवळील मोबाइलचे लोकेशन ट्रेस केले आणि त्याचा पाठलाग करत त्याच्याजवळ पोहोचले. त्यानंतर या तरुणानेच सारा कट रचला होता हे पोलिसांच्या समोर उघड झाले. प्रेयसीवर खर्च करण्यासाठी लागणारे पैसे घरातून मिळत नसल्याने त्याने असा बनाव रचला असल्याचे समोर आले. पोलीसही या घटनेने हैराण झाले. त्यांनी आरोपी तरुणावर गुन्हा दाखल करत त्याला तुरुंगात डांबले. पोलीस तपासात समोर आले की त्याने मोबाइलवर व्हॉइस चेंजर अॅप डाउनलोड करून त्याद्वारे आवाज बदलून घरच्यांना फोन केला आणि खंडणी मागितली. पैसे न मिळाल्यास तरुणाला मारून टाकू अशी धमकी देखील दिली.