
वेब सिरीजच्या चित्रीकरणासाठी मुंबईत आलेल्या 17 परदेशी डान्सर आणि बॅक स्टेज कलाकारांविरोधात दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. व्हिसाच्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली. त्या कलाकारांमध्ये महिलांचादेखील समावेश आहे.
दहिसरच्या कोकणीपाडा येथे एक स्टुडिओ आहे. त्या स्टुडिओमध्ये 25 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या काळात चित्रीकरण केले जाणार होते. त्या चित्रीकरणासाठी संबंधित स्टुडिओच्या वतीने मुंबई पोलिसांच्या चित्रपट शाखेच्या कक्षात पत्रव्यवहार करून परवानगी घेतली होती. टायगर बेबी डिजिटल प्रॉडक्शन हाऊसच्या वतीने वेब सिरीजसाठी तो स्टुडिओ भाडय़ाने घेतला होता. त्या स्टुडिओमध्ये काही परदेशी कलाकार हे टुरिस्ट व्हिसावर मुंबईत येऊन वेब सिरीजसाठी काम करत असल्याची माहिती दहिसर पोलिसांना मिळाली.
वरिष्ठ निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक मराठे, सहाय्यक निरीक्षक जिनपाल वाघमारे, उपनिरीक्षक रविराज कट्टे, अतुल फडतरे, धनू, किणी, थापड, महिला पोलीस शिपाई क्षीरसागर, आहिर आदींचे पथक तेथे गेले. त्या ठिकाणी वेब सिरीजचे चित्रीकरण सुरु होते. काही परदेशी कलाकार तेथे दिसल्याने पोलिसांनी त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली. तेव्हा त्याने पोलिसांना समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. पोलिसांनी त्या प्रॉडक्शन हाऊसच्या एकाची चौकशी केली. ते कलाकार हे रोजंदारीवर डान्सर आणि बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणून काम करतात. ते रशिया, लंडन, लुथिनिया, ऑस्ट्रेलिया, या देशाचे नागरिक आहेत. काही जण हे दोन तर काही हे दहा दिवसांपूर्वी मिटिंग आणि टुरिस्ट व्हिसाच्या नावाखाली मुंबईत आल्याचे तपासात समोर आले आहे. व्हिसाच्या अटींचे उल्लंघन केल्या प्रकरणी पोलिसांनी त्या 17 कलाकारांविरोधात गुन्हा नोंद केला. या गुह्यात अद्याप कोणालाही पोलिसांनी अटक केलेली नाही.





























































