
नामांकित कंपनीचा मोबाईल कमी किमतीत विकायच्या बहाण्याने पाऊचमध्ये भरलेला काचेचा तुकडा हातावर ठेवून पसार होणारे य्tैपीचे दोन भामटे पार्क साईट पोलिसांच्या हाती लागले आहेत.
विक्रोळी येथील एलबीएस मार्गावरील अवंती इमारतीजवळ उभ्या असलेल्या एका रिक्षाचालकाकडे शुक्रवारी दोन तरुण आले. त्यांनी त्यांच्याकडील पाऊचमध्ये ठेवलेला एक मोबाईल दाखवून तो विकायचा असल्याचे चालकाला सांगितले. तडजोडी अंती एक हजार रुपयांवर सौदा पटल्यानंतर आरोपींनी रिक्षाचालकाकडून हजार रुपये घेतले आणि त्याच्या हातात पाऊच सोपवला. चालकाने पाऊच उघडण्याचा प्रयत्न केला, पण त्याची चेन इतकी घट्ट होती की ती उघडतच नव्हती.
काहीतरी गडबड असल्याचे वाटल्याने चालकाने आरडाओरड केली. तेव्हा त्याच परिसरात गस्तीवर असलेले हवालदार ससाणे यांनी पळून जाणाऱया दोघांपैकी एकाला पकडले. त्याला पोलीस ठाण्यात आणले असता नईम बशीर कुरेशी (33) असे त्याने नाव सांगितले. वरिष्ठ निरीक्षक विनायक मेर, निरीक्षक विक्रम बनसोडे, एपीआय मोहन जगदाळे तसेच सुतार, गायकवाड, नवले यांनी अधिक तपास केला असता नईमकडे मोबाईलच्या आकाराच्या 22 काचा आणि 43 रिकामी पाऊच सापडले.
कामगार, मजूर, चालक टार्गेट
कामगार, मजूर, रिक्षा व टॅक्सीचालक त्यांचे मुख्य टार्गेट असतात. मोबाईलच्या नावाखाली त्या आकाराची काच पाऊचमध्ये भरून ते देतात आणि पैसे घेऊन पसार होतात. अशी दोघांची मोडस ऑपरेंडी असल्याचे पोलिसांनी सांगितले.




























































