
इंडियन प्रीमियर लीगमध्ये शुक्रवारी 12 मे रोजी झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा 27 धावांनी पराभव केला. या लढतीत मुंबईच्या फलंदाजीचा कणा असणाऱ्या सूर्यकुमार यादव याने चौफेर फटकेबाजी करत आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक ठोकले. या खेळीबद्दल त्याचा ‘सामनावीर’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. वानखेडेवर झालेला हा सामना सूर्यकुमारच्या फलंदाजीसह आणखी एका कारणासाठी चर्चेत राहील. ते म्हणजे तारीख.
हो, आयपीएलमध्ये 12 मे या तारखेचे मुंबई इंडियन्ससाठी विशेष महत्त्व आहे. कायरॉन पोलार्डचा वाढदिवस असणाऱ्या 12 मे रोजी सामना म्हणजे विजयाची गॅरंटी असे समिकरण झाले आहे. 2009 पासून मुंबई इंडियन्ससाठी ही तारीख लकी ठरल्याचे दिसतेय. या लकी तारखेची सुरुवात 12 मे 2009 ला झालेली.
14 वर्षांपूर्वी या तारखेला खेळला गेलेला सामना मुंबई इंडियन्सने 8 विकेट्सने जिंकला होता. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने तेव्हा किंग्स इलेव्हन पंजाबचा पराभव केला होता. त्यानंतर प्रत्येक वेळी 12 मे रोजी झालेला सामना मुंबईने जिंकला आहे.
– त्यानंतर 12 मे 2012 रोजी झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 27 धावांनी पराभव केला होता.
– 12 मे 2014 रोजी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा 7 विकेट्सने पराभव केला होता.
– 12 मे 2019 ही तारीख मुंबईचे चाहते विसरू शकत नाहीत. कारण याच दिवशी मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सचा अवघ्या एका धावेने पराभव करत आयपीएल करंडक जिंकला होता.
– गेल्या वेळेस 12 मे 2022 ला झालेला सामनाही मुंबईने जिंकला होता. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झालेला हा सामना मुंबई इंडियन्सने 5 विकेट्सने जिंकला होता.
– आता यंदाच्या हंगामात 12 मे 2023 रोजी झालेल्या लढतीतही मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सवर 27 धावांनी विजय मिळवत ही परंपरा कायम राखली.

























































