‘एवढी भाव का खातेस?’ म्हणत मुलीच्या ओठांवरून फिरवली 100 ची नोट, न्यायालयाने सुनावली शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विशेष पॉक्सो कायदा न्यायालयाने मुंबईतील एका व्यक्तीला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीला एवढी भाव का खातेस? असे म्हणत तिच्या ओठांवरून 100 रुपयांची नोट फिरवली होती. या प्रकरणात, पोलिसांनी त्या व्यक्तीला अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. या 32 वर्षीय दोषी व्यक्तीला शिक्षा सुनावताना, त्या व्यक्तीचे कुटुंब त्याच्यावर अवलंबून आहे आणि त्याची आई कर्करोगाची रुग्ण आहे. हे न्यायालयाने लक्षात घेतले.

याप्रकरणी विशेष न्यायाधीश एस.सी. जाधव म्हणाले की, “गुन्ह्याचे गांभीर्य आणि त्याला अपेक्षित असलेली शिक्षा लक्षात घेऊन योग्य ती शिक्षा देणे हे न्यायालयाचे कर्तव्य आहे.” विशेष सरकारी वकील वीणा शेलार यांनी आरोपीला दोषी ठरवण्यासाठी दिलेल्या साक्षीदारांमध्ये मुलगी, तिची आई आणि शेजारी यांचा समावेश आहे.

आरोपीला 14 जुलै 2017 रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. एप्रिल 2018 मध्ये जामीन मिळाल्यानंतर त्याला आणखी एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. या घटनेतील 16 वर्षीय तरुणीने न्यायालयात सांगितले की, 13 जुलै 2017 रोजी रात्री आठ वाजता ती शेजाऱ्यासोबत बाजारात गेली होती. यावेळी आरोपी तिचा पाठलाग करत आला. यावेळी त्याने वाटेत मुलीला थांबवले आणि तिच्याजवळ जात त्याने तिच्या ओठांवर 100 रुपयांची नोट फिरवली. यावेळी अल्पवयीन मुलीने रागाने आरोपीकडे पाहिले तेव्हा तो म्हणाला, ‘तू असे का करतेस, इतकी भाव का खातेस?’.

यानंतर ती घाबरलेल्या अवस्थेत घरी परतली आणि तिच्या आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आई-मुलीने पोलीस स्टेशन गाठून त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.