कुर्ल्यात कुख्यात गुंडाची सावत्र भावाकडून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

कुर्ल्याच्या हलाव पूल परिसरात आज सकाळच्या सुमारास कुख्यात गुंड जानू यल्लप्पा पवार ऊर्फ बिल्ला याची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली. ही हत्या त्याच्याच सावत्र भावाने प्रॉपर्टीच्या वादातून केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

कुर्ल्यातील विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिल्ला राहत होता. तो गुंड होता. त्याच्यावर सातहून अधिक गंभीर गुह्यांची नोंद दाखल आहे. आज सकाळी हवाल पूल परिसरात बिल्ला असताना दुचाकीवरून आलेल्या इसमाने त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. बिल्लाच्या मान, पोट व छातीवर गोळी लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यातच रस्त्यावर आडवा झाला. नागरिकांनी त्याला शीव रुग्णालयात नेले. मात्र उपचार सुरू करण्याआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर बिल्लावर गोळीबार करणारा त्याचा सावत्र भाऊ विनोबा भावे पोलीस ठाण्यात हजर झाला. प्रॉपर्टीच्या वादातून त्याने बिल्लाला मारल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. बिल्लाच्या वडिलांच्या तीन पत्नी होत्या. त्यापैकी बिल्ला हा पहिल्या पत्नीचा तर त्याला मारणारा तिसऱया पत्नीचा मुलगा आहे. बिल्ला त्याच्या वडिलांची रूम बळकविण्याचा प्रयत्नात होता. त्यावरून त्यांचाच वाद होता. त्यातूनच बिल्लाची हत्या झाल्याचे सांगण्यात येते.