Mumbai news – मुंबई, उपनगरात पावसाचे धुमशान; पाणलोट क्षेत्रातही मुसळधार, पवई तलाव ‘ओव्हरफ्लो’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना गेल्या काही दिवसांपासून दिलासा मिळाला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या जलस्रोतांपैकी आणि बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी एक महत्त्वाचा मानला जाणारा पवई तलाव 1 जुलैला पहाटे साडे पाचच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे.

चालू मान्सूनच्या हंगामात पूर्ण भरून वाहणारा हा मुंबईतील पहिलाच तलाव ठरला आहे. एकूण 545 कोटी लीटर एवढी प्रचंड जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे पाणी पातळीने कमाल मर्यादा ओलांडली.

पाण्याचा वापर केवळ औद्योगिक कारणांसाठी

महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पवई तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्यामुळे त्याचा वापर मुंबईकरांना पिण्यासाठी केला जात नाही. या तलावातील पाण्याचा वापर प्रामुख्याने औद्योगिक बाबींसाठी आणि आरे मिल्क कॉलनीतील बिगर-पिण्याच्या कामांसाठी केला जातो. असे असले तरी, या तलावाच्या ओव्हरफ्लोमुळे परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होते, तसेच हा तलाव भरल्याने मुंबईच्या एकूण पावसाळी वातावरणात सकारात्मक चित्र निर्माण होते.

24 तासांत उपनगरात रेकॉर्डब्रेक पाऊस

बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार आणि शहरात बसवण्यात आलेल्या स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रांच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत मुंबई आणि उपनगरांमध्ये तुफान पाऊस झाला आहे. पूर्व उपनगरांमध्ये सरासरी 109मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून, पश्चिम उपनगरांमध्ये 87 मिमी तर मुंबई शहरात 86 मिमी सरासरी पाऊस पडला आहे. उपनगरातील मानखुर्द परिसरात सर्वाधिक म्हणजे तब्बल 170.4 मिमी रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल मुंबई शहरातील भायखळा येथे 162.52 मिमी इतका मुसळधार पाऊस पडला आहे.

मुसळधार ते अतिमुसळधार

दरम्यान, हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवस मुंबई आणि परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे तलावांमधील पाण्याची आवक अशीच सुरू राहणार असून, यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांची पाण्याची चिंता बऱ्याच अंशी मिटण्याची शक्यता आहे.