
सामना प्रतिनिधी । मुंबई
ईद ए मिलादच्या दिवशी भेंडीबाजारात मेळावा बघण्यासाठी गेलेल्या नसरीन हबीबउल्ला खान (29) या महिलेची नजर चुकवून तिच्या नऊ महिन्यांच्या मुलीला एक महिला चोरून पळाली होती. याप्रकरणी तक्रार दाखल होताच जे. जे. मार्ग पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढत 24 तासांत त्या महिलेला शोधून काढत नऊ महिन्यांच्या मुलीला सुखरूप ताब्यात घेतले.
मानखुर्द येथे राहणारी नसरीन तिच्या तीन मुलांसह 21 तारखेला ईद साजरी करण्यासाठी भेंडीबाजारात गेली होती. तेथे सुरू असलेल्या मेळाव्याच्या ठिकाणी बांधलेल्या स्टेजवर ती मुले घेऊन बसली होती. तेव्हा तिच्या सोबत तिची नणंददेखील होती. त्यावेळी त्यांच्या बाजूला बसलेल्या महिलेने तिची मुलगी गुल्बसा (नऊ महिने) हिला खेळविण्यासाठी स्वतःकडे घेतले. त्यानंतर नसरीनने पुन्हा गुल्बसाला आपल्याकडे घेतले. दरम्यान, नसरीनच्या नणंदेला चक्कर आल्यासारखे वाटू लागल्यामुळे ती पुढे वाकून बसली. तर दुसऱ्या मुलीला तहान लागली म्हणून नसरीन तिला पाणी पाजू लागली. हीच संधी साधत नविका मन्सुरी (28) नावाची महिला गुल्बसाला उचलून निघून गेली. जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र घेवडेकर व पथकाने शोधाशोध सुरू केली. परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपी महिलेचे रेखाचित्र तयार केले. अखेर नळबाजार परिसरात राहणाऱया नविका मन्सुरी हिच्या घरातून मन्सुरी हिच्या घरात जाऊन गुल्बसा व नविकाच्या मावशीला ताब्यात घेण्यात आले.





























































