
मुंबईत एका पोलीस शिपायाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी पोलीस शिपायाला निलंबीत करून त्याला अटक करण्यात आली आहे.
इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. हर्षल बोडके ही व्यक्ती कल्याणचा रहिवासी असून गेली 5 वर्षे महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहे. रविवारी बोडके आपल्या काही मित्रांसोबत भांडूपमध्ये आला होता. बोडके आपल्या मित्रांसोबत दारू प्यायला आणि घरी जायला निघाला.
तेव्हा भांडूप स्थानकाजवळ त्याने एका 10 वर्षाच्या मुलीला चुकीच्या हेतूने स्पर्श केला. तेव्हा पीडित मुलीच्या आईने आरडाओरड केला आणि मदत मागितली. पीडित मुलीच्या आईने तत्काळ जवळच्या पोलीस स्थानकात धाव घेतली आणि बोडके विरोधात तक्रार दाखल केली.पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि बोडकेला अटक केली.
तर दुसरीकडे बोडकेने आपल्यावरील झालेले सर्व आरोपांचे खंडण केले आहे. बोडकेचे लग्न झाले आहे, परंतु त्याला मूल नाही. आपण फक्त त्या मुलीशी बोलत होतो, मुलीला आपण चुकीच्या हेतूने स्पर्श केले नसल्याचे बोडकेने म्हटले आहे. पोलिसांनी बोडकेला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्याला तत्काळ कामावरून निलंबीत केले. या प्रकरणी पोलीस पुढील चौकशी करत आहेत.































































