पावसामुळे मध्य रेल्वेची घाबरगुंडी, वाहतूक उशिराने होत असल्याने प्रवासी वैतागले; वसई-विरारमधील शाळांना सुट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई , उपनगरे आणि आसपासच्या परीसरात मुसळधार पाऊस पडतोय. या पावसाचा नेहमीप्रमाणे मध्य रेल्वेला फटका बसला आहे. गुरुवारी मध्य रेल्वेची वाहतूक रडतखडत सुरू होती. मध्य रेल्वे मार्गावरील बहुसंख्य गाड्या या उशिराने धावत असल्याने मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

रात्रभर पडणारा पाऊस पाहिल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक बंद झाली असेल असं प्रवाशांना वाटत होतं. व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक, वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रे, एम इंडिकेटरवरील चॅट ग्रुप यामध्ये लोकल ट्रेनची वाहतूक सुरू आहे का ? हा प्रश्न हजारो प्रवाशांनी विचारला होता. लोकल बंद झाली तर आपला त्रास टळेल आणि एक दिवस वर्क फ्रॉम होम करता येईल हा या प्रश्नांमागचा विचार होता. मात्र लोकल सुरू आहे हे कळाल्यानंतर हे प्रवासी घराबाहेर पडले. लोकल ट्रेन उशिराने धावत असल्याने स्टेशनवरील आणि गाडीतील गर्दी यामुळे प्रवाशांचा जीव मेटाकुटीला आला आहे. वसई-विरार या भागात पावसाची संततधार कायम असून या भागातील शाळांना खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी देण्यात आली आहे.

पुढील 3-4 तासात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यातील घाट परीसर आणि साताऱ्यातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान वर्तवण्यात आली आहे.