
शीख समुदायाच्या भावना दुखावल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावतवर कारवाई करण्याची मागणी दिल्ली शीख गुरुद्वारा कमिटीने केली आहे. कमिटीने मागणीचे पत्र खार पोलिसांना दिले आहे. कायदेशीर सल्ला घेऊन पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.
अभिनेत्री कंगना राणावत ही नेहमीचे वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत असते. नुकतेच तिने हिंदुस्थानला 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्याचे वादग्रस्त विधान केले होते. तसेच कंगनाने शीख समुदायाच्या भावना दुखावतील अशी व्यक्तव्ये केली आहेत. धार्मिक भावना दुखावल्याने दिल्ली शीख गुरुद्वारा कमिटीच्या शिष्टमंडळाने आज खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काबदुले यांची भेट घेतली व आपल्या मागण्यांचे पत्र पोलिसांना दिले. त्यानंतर या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांची भेट घेतली.
धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कंगनाविरोधात कारवाईसाठी पोलीस आता कायदेशीर सल्ला घेणार आहेत. कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. यापूर्वीदेखील कंगनाने हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण होऊन जातीय सलोखा बिघडेल असे ट्विट केले होते. वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल केला होता.




























































